मुंबई : महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून, राज्यातील विद्यमान सर्व मतदारांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज (एन्युमरेशन फॉर्म) भरून त्यावर स्वाक्षरी करून तो संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे. बीएलओ गृहभेटीदरम्यान हे अर्ज स्वीकारणार असून, निर्धारित मुदतीत अर्ज सादर करणाऱ्या मतदारांची नावे १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत. ज्या पात्र नागरिकांचे नाव प्रारूप यादीत समाविष्ट झालेले नसेल किंवा जे नव्याने मतदार म्हणून नोंदणी करण्यास पात्र असतील, त्यांना १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आवश्यक घोषणापत्र आणि संबंधित कागदपत्रांसह नमुना क्रमांक ६ भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. या कालावधीत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी प्राप्त अर्जांची पडताळणी करून पात्र अर्जदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करतील. दावे आणि हरकती नोंदविण्याच्या या प्रक्रियेदरम्यान नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६, मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना क्रमांक ८ आणि मतदार यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७ भरून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपल्या नावाची आणि नोंदींची खात्री करून आवश्यक ती कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करावी, असेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने अर्ज भरताना अचूक आणि सत्य माहिती देण्याचे विशेष आवाहन केले आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा अथवा खोटी माहिती दिल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ अंतर्गत संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. या तरतुदीनुसार दोषी आढळणाऱ्या व्यक्तीस एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षांची शिक्षा होऊ शकते, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील अंतिम मतदार यादी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यानंतरही लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम २२ आणि २३ नुसार पात्र नागरिकांना विहित नमुना क्रमांक ६ द्वारे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा आवश्यक दुरुस्तीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. मतदार यादीचे अद्ययावतीकरण ही सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया असल्याने कोणत्याही निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पात्र मतदारांना नाव समाविष्ट करणे किंवा आवश्यक बदल करण्याची संधी उपलब्ध असते. त्यामुळे सर्व नागरिकांनी वेळेत आवश्यक अर्ज भरून मतदार यादीतील आपली नोंद अचूक असल्याची खात्री करून घ्यावी आणि निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभागासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

