मुंबई : राज्यातील सीईटी आणि टीईटी परीक्षांच्या कथित पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून येत्या सात दिवसांत राजीनामा द्यावा, अन्यथा समविचारी संघटना आणि विविध पक्षांसोबत काँग्रेस विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांनी दिला. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली. साळुंखे यांनी आरोप केला की, नीट पेपरफुटीप्रमाणेच राज्यात सीईटी आणि टीईटी परीक्षांमध्येही गंभीर अनियमितता झाल्याने लाखो विद्यार्थी आणि पालकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्वीकारलेली नाही. राज्यातील शिक्षण व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत असून, शिक्षण हे सेवा क्षेत्र न राहता आर्थिक फायद्याचे साधन बनल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षकांवर बीएलओसह विविध अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकल्यामुळे शाळांमधील अध्यापनावर परिणाम होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच अतिरिक्त कामाच्या ताणामुळे शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सांगत, मुंबईतील एका शिक्षकाचा तणावामुळे मृत्यू झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला. शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण तसेच वैद्यकीय शिक्षण विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप करत, शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहार तातडीने थांबवण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी सागर साळुंखे यांनी राज्यात बोगस नर्सिंग महाविद्यालयांचा सुळसुळाट झाल्याचाही आरोप केला. पुण्यातील एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून ८१ हजार रुपये विकास शुल्क आणि १७ हजार रुपये शिक्षण शुल्क आकारून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेसाठी कोट्यवधी रुपयांची निविदा काढण्यात आली असतानाही अकरावी प्रवेश प्रक्रियेत अजूनही सुमारे चार लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रलंबित असल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षण विभागातील हे कथित गैरप्रकार तातडीने थांबवले नाहीत, तर सरकारला रस्त्यावर उतरून जाब विचारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनीही पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना टीईटी पेपरप्रकरणानंतर युवक काँग्रेसने विविध आंदोलनांच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. मात्र, सरकारने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा राजीनामा स्वीकारला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेत करण्यात आलेले हे सर्व आरोप संबंधित नेत्यांनी मांडले असून, त्यावर सरकारकडून अधिकृत भूमिका समोर येणे अपेक्षित आहे.
