पुणे : ‘पुणे तिथं काय उणे’ असं नेहमी म्हटलं जातं. याचीच प्रचिती पुण्यात वारंवार येत असते. पुण्यातील कॅम्प परिसरात फुकट चपलांसांठी एका मायलेकीनं चक्क आयपीएस अधिकारी असल्याचं सांगून चप्पल खरेदी करून पसार झाल्या. या मायलेकीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेची सध्या पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी मिनाज मुर्तजा शेख (वय ४०), रिबा मुर्तजा शेख (वय. १९,) या मायलेकींना अटक करून त्यांच्याकडून ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. याबाबतची माहिती लष्कर पोलिसांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी आरोपी महिला मिनाज आणि तिची मुलगी रिबा या दुकानात आल्या. मिनाज हिने आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून बनावट ओळखपत्र दाखविले. त्यानंतर लग्नाचा कार्यक्रम असल्याचे सांगत मोठ्या प्रमाणावर चप्पल व बूट खरेदी करून पैसे देण्यासाठी कमिश्नर ऑफिसला चल, असं तिनं तेथील कामगाराला सांगितलं. मात्र, पैसे न देता तब्बल १७ हजारांचा माल घेऊन दोघी पसार झाल्या. दुकानदाराने दिलेल्या तक्रारीनंतर, एम. जी. रोड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपींचा ठावठिकाणा पोलिसांच्या हाती लागला. अखेर १ आणि २ ऑक्टोबर रोजी दोघींना अटक करण्यात आली आहे.आरोपी महिला मिनाज आणि तिची मुलगी रिबा या दोघींच्या विरुद्ध यापूर्वी कोंढवा पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.