मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. मात्र यंदा शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य मिळाले नसल्याचे चित्र समोर आले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी दप्तरांसह विविध वस्तूंची खरेदी पूर्ण होणे अपेक्षित असताना महानगरपालिकेने आता दप्तर खरेदी प्रक्रिया पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून त्यास अंतिम मान्यता मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांपर्यंत दप्तर पोहोचण्यासाठी आणखी एक ते दीड महिना लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका दरवर्षी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके, दप्तर, छत्री, रेनकोट, शूज, पाण्याची बाटली, वह्या, पेन्सिल, गणवेश आणि इतर आवश्यक साहित्य अशा एकूण २७ वस्तू मोफत उपलब्ध करून देते. महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. नियमानुसार जानेवारी महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून मे अखेरपर्यंत सर्व साहित्य शाळांमध्ये पोहोचणे अपेक्षित असते. मात्र निविदा प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे यंदा साहित्य खरेदीचे कामही उशिराने सुरू झाले आहे.
दप्तर खरेदीसाठीची निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून संबंधित प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मंजुरीनंतर पुरवठा प्रक्रिया सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दप्तर मिळण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडण्याची शक्यता आहे. या खरेदीसाठी मुंबई महानगरपालिका सुमारे ४६ कोटी ४५ लाख रुपयांचा खर्च करणार आहे. पूर्वप्राथमिक वर्गांपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नवीन दप्तरांचे वितरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार आणि गरजेनुसार दप्तरांची किंमत वेगवेगळी निश्चित करण्यात आली असून ती साधारणपणे ३६५ रुपयांपासून ५८९ रुपयांपर्यंत असणार आहे. दप्तरांसोबत पाण्याची बाटली आणि जेवणाचा डबा देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन्ही वस्तूंसाठी स्वतंत्र खर्च करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येकी १६५ ते १९३ रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, शालेय वर्ष सुरू झाल्यानंतरही साहित्य वितरणात होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. भविष्यात शैक्षणिक साहित्य वेळेत उपलब्ध व्हावे यासाठी निविदा आणि खरेदी प्रक्रिया अधिक नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

