मुंबई : मेघालयाच्या आकाश चौधरीने सुरत येथे रणजी ट्रॉफीच्या प्लेट गटातील सामन्यात इतिहास रचला. अरुणाचल प्रदेशविरुद्ध खेळताना त्याने एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. गॅरी सोबर्स आणि रवी शास्त्री यांच्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हा विक्रम करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. इतकेच नाही, तर अवघ्या ११ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत त्याने नवा विक्रमही प्रस्थापित केला. त्याने सलग आठ षटकारांची आतषबाजी केली.
वेगवान गोलंदाज असलेला आकाश चौधरी आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्यावेळी मेघालय ६ बाद ५७६ धावांवर खेळत होता. पहिला चेंडू निर्धाव खेळल्यानंतर त्याने दोन चेंडूंवर एकेरी धावा घेतल्या. त्यानंतर १२६ व्या षटकात लिमार दावीच्या गोलंदाजीवर त्याने सलग सहा षटकार लगावले. पुढील षटकातील पहिल्या दोन चेंडूंवरही त्याने षटकार खेचत अवघ्या ११ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. मेघालयने ६ बाद ६२८ धावांवर डाव घोषित केला, तेव्हा आकाशने १४ चेंडूंमध्ये आठ षटकारांसह नाबाद ५० धावा केल्या होत्या. याआधीचा ११ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकण्याचा विक्रम लीस्टरशायरच्या वेन व्हाइटच्या नावावर होता, ज्याने २०१२ मध्ये १२ चेंडूंमध्ये हे यश मिळवले होते.

