मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर बुधवारी म्हणजे 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. आता शिवसेनेचा निकाल दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर अध्यक्षांना निकाल द्यायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नार्वेकर यांना 31 जानेवारीपर्यंत या याचिकांवर निर्णय घ्यावा लागणार आहे. ही कार्यवाही 6 जानेवारीपासून सुरू झाली होती. 20 जानेवारीला साक्षीदारांची उलटतपासणी, तर 23 जानेवारीला प्रतिवादींची उलटतपासणी होणार आहे. अंतिम सुनावणी 25 जानेवारीला सुरू होईल आणि 27 जानेवारीला संपेल. त्यानंतर अध्यक्ष नार्वेकर आपला निर्णय देतील.
विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या याचिकांवर अध्यक्षांवर निर्णय देतील मात्र त्याआधी निवडणूक आयोग राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाचा निर्णय देतील. केंद्रीय निवडणूक आयोग येत्या आठवडाभरातच हा निर्णय येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कुणाची यावरून निवडणूक आयोगात सुनावणी संपली होती. लेखी सबमिशनसाठी वेळ दिला होता. आता प्रतीक्षा निकालाची असेल.
अजित पवार गट आणि शरद पवार गटानं एकमेकांवर बनावट शपथपत्र सादर केल्याचा आरोप केलाय. सुनावणीदरम्यान अजित पवार गटानं शरद पवारांच्या कार्यप्रणालीवरही आक्षेप घेतले होते, त्यामुळे या निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. शिवसेना शिंदेंचीच असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला. आता नार्वेकरांसमोर राष्ट्रवादी कुणाची याची सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिवसेना शिंदेंची तर राष्ट्रवादी कुणाची याची चर्चा सुरु झालीय.
ही अजित पवार गटासाठी जमेची बाजू..
शिवसेना फुटीवरील निकालानंतर राष्ट्रवादीमधील फुटीवर महिन्याभरात निकाल देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. शिवसेनेचा प्रश्न अध्यक्षांकडून निकाली निघाल्यानंतर आता लगेचच राष्ट्रवादीच्या शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटाकडून एकमेकांविरोधात आमदार अपात्र ठरवण्यासाठी केलेल्या अर्जांवर अध्यक्षांकडे सुनावणी सुरु होईल. शिवसेनेतील फुटीवरील निकालात अध्यक्ष नार्वेकर यांनी पक्षाची सूत्रे कोणाकडे यावर निरीक्षण नोंदवलं. विधिमंडळातील बहुमताचा आधार घेतला. विधिमंडळातील पक्षाला पक्ष संघटनेपेक्षा अधिक महत्त्व नार्वेकरांनी निकालात दिलं. ही बाजू अजित पवार गटासाठीही जमेची ठरणार आहे. शिवसेनेतील फुटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागल्याने राष्ट्रवादीतील फुटीत अजित पवार यांच्या गटाच्या बाजूने निकाल लागेल अशी अपेक्षा अजित पवार गटातील नेत्यांना आहे. अजित पवार गटाचे नेते निकाल आपल्याच बाजूने लागेल याबद्दल फार आशावादी आहेत. शिवसेनेतील फुटीवरील निकालाने आम्ही निश्चिंत आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्याने दिली आहे.
अजित पवार गट 2023 च्या मे महिन्याच्या सुरुवातीला राज्यात सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाला. अचानक झालेल्या या राजकीय घडामोडींमध्ये अजित पवारांबरोबरच त्यांच्या 8 समर्थक आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांच्यासहीत अन्य महत्त्वाच्या आमदारांचा समावेश होता.