रायगड : आबालवृद्धांची आवडती असणारी माथेरानची राणी अर्थात नेरळ – माथेरान मिनी ट्रेन १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू होणार होती. परंतु परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने मुहूर्त हुकला होता. मात्र आता रेल्वेने पर्यटकांना खूशखबर दिली आहे. १ नोव्हेंबरला मिनी ट्रेनचा मुहूर्त ठरला आहे. माथेरानच्या राणीची शीळ चार महिन्यांनंतर दरी-खोऱ्यांत गुंजणार असल्याने झुक झुक गाडीत बसण्यासाठी आबालवृद्धांना आता जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.
दरवर्षी पावसाळी चार महिने नेरळ माथेरान मिनी ट्रेन बंद असते. यावर्षी ८ जूनपासून मिनी ट्रेन पावसाळी सुट्टीवर गेली होती. ही ट्रेन १५ ऑक्टोबरपर्यंत बंद असणार असे रेल्वेने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले होते. पावसाळी हंगाम संपला असला तरी ऑक्टोबर सुरू होताच परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. माथेरान घाटात पावसाची रिपरिप कायम असून दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरक्षेचे कारण पुढे करत रेल्वेने १५ ऑक्टोबरला सुरू होणारी ट्रेन सेवा पुढे ढकलली होती. मात्र आता पर्यटकांची प्रतीक्षा संपणार आहे. नेरळ-माथेरान मार्गाची दुरुस्ती अखेरच्या टप्प्यात असून विस्टा डोम डब्यांसह इंजिनदेखील लोको शेड नेरळ येथे आणण्यात आले आहे.