पुणे : पुणे महापालिकेच्या शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतरही फी न दिल्यामुळे शाळेने तब्बल १००० पेक्षा जास्त मुलांचा निकाल राखून ठेवल्याचा प्रकार समोर उघडकीस आला आहे. पालिकेच्या या भोंगळ कारभारावर पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा अंतिम निकाल सर्वत्र जाहीर करण्यात आला आहे. परंतु पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल ही फी न भरल्यामुळे राखून ठेवण्यात आलेला आहे.
तब्बल एक हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. मात्र महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांवरती अन्याय झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या धक्कादायक प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांकडू संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे मुलांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास मनपा शिक्षण मंडळ जबाबदार असेल अशा संतप्त प्रतिक्रिया पालकांकडून उमटत आहेत.