मुंबई : मेट्रो ट्रेनने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांना आणि गर्भवती महिलांनासाठी खूशखबर आहे. मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या तीन लाखापर्यंत पोहोचल्याने प्रवाशांना दाटीवाटीने प्रवास करावा लागतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह गर्भवती महिलांची प्रवास दरम्यान मोठी गैरसोय होते. त्यापार्श्वभूमीवर सध्या ज्येष्ठांसाठी असलेली राखीव सीटची संख्या वाढवण्याबरोबरच गर्भवती महिलांसाठी राखीव सीट ठेवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. एमएमआरडीएकडून सध्या अंधेरी- गुंदवली दरम्यान सहा डब्यांच्या २२ मेट्रो ट्रेन चालवल्या जातात. वाहतूक कोंडीशिवाय गारेगार प्रवास करता येत असल्याने प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. मात्र सध्या ६ डब्यांच्या गाडीत एक डबा महिलांसाठी राखीव आहे, तर उर्वरित पाच डब्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव सीट असल्या तरी त्या अपुऱ्या ठरत आहेत.
त्यामुळे अनेकदा वयस्क प्रवाशांना बसण्यासाठी जागा न मिळाल्याने उभा राहूनच प्रवास करावा लावतो. एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी नुकताच मेट्रो ट्रेनने प्रवास करत प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांची गैरसोय होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी ज्येष्ठांसाठी राखीव सीट वाढवण्याचा आणि गर्भवती महिलांसाठी राखीव सीट ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांना आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी एमएमआरडीएकडून वेगवेगळ्या टप्प्यावर प्रयत्न सुरू आहेत. तसेच भविष्यात मेट्रो ट्रेनची संख्या वाढवण्याची एमएमआरडीएची योजना आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणखी गती मिळू शकणार आहे.