मुंबई : मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय म्हणून शहरात नवीन सागरी मार्ग उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट, कफ परेड, कुलाबा आणि नेव्हीनगर या भागांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी सुमारे १.८७ किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग उभारण्यात येणार आहे. सध्या या भागात जाण्यासाठी कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, मादाम कामा मार्ग, वीर नरिमन मार्ग आणि महर्षी कर्वे मार्ग या प्रमुख रस्त्यांचा वापर केला जातो. मात्र, या मार्गांवर कायम वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना मोठा वेळ वाया घालवावा लागतो. भविष्यात या परिसरात विविध विकास प्रकल्प उभारले जाणार असल्याने वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हा सागरी मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील विविध भागांमधील प्रवासाचा कालावधी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना जलद आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. शासनाच्या पायाभूत सुविधा विकास आराखड्यात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समाविष्ट करण्यात आला असून, वाहतूक व्यवस्थेवरचा वाढता ताण कमी करण्यासाठी तो उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रस्तावित सागरी मार्गाची एकूण लांबी १.८६९ किलोमीटर असून त्याची रुंदी १६ मीटर असणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १.७६५ हेक्टर संपादित भूभागाची आवश्यकता असून त्यामध्ये महापालिका तसेच मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनींचा समावेश असेल. प्रकल्पांतर्गत दोन स्वतंत्र रॅम्प, समुद्रावरील पूल आणि किनारी मार्ग उभारण्यात येणार आहेत. पहिला रॅम्प ७०४ मीटर, दुसरा दुहेरी स्तराचा रॅम्प ४१८ मीटर, समुद्रावरील पूल ६१४ मीटर, तर त्यापुढे सिल्ट क्षेत्रावर ५९९ मीटर लांबीचा किनारी मार्ग उभारला जाणार आहे. पर्यावरणीय परिणाम लक्षात घेऊन प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या १३२ झाडांपैकी शक्य तितकी झाडे वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार असून ७९ झाडांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. तसेच समुद्रातील सुमारे ०.०७७ हेक्टर क्षेत्रात भराव टाकून आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येतील. आधुनिक तांत्रिक मानकांनुसार उभारला जाणारा हा सागरी मार्ग पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबईतील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल आणि भविष्यातील वाढत्या वाहनभाराचा सामना करण्यासाठी शहराला सक्षम पर्याय उपलब्ध होईल.

