ठाणे : गुजरातमधून खासगी प्रवासी बसद्वारे महाराष्ट्रात आणला जात असलेला अंदाजे २ ते ३ टन संशयित भेसळयुक्त मावा महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन यांच्या पथकाने जप्त केला आहे. फाउंटन हॉटेल परिसरात पहाटे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या माव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्याचा दर्जा आणि सुरक्षितता प्रयोगशाळेतील अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी पुढील तपास आणि आवश्यक कायदेशीर कारवाई अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट उत्पादनांची विक्री आणि अन्नसुरक्षेशी संबंधित गैरप्रकारांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये धडक तपासण्या सुरू असून नागरिकांकडूनही संशयास्पद अन्नपदार्थांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येऊ लागल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषय असल्याने या कारवायांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
अधिकृत माहितीनुसार, ३० जून २०२६ रोजी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने फाउंटन हॉटेल परिसरात सापळा रचला होता. गुजरातमधून आलेल्या एका खासगी प्रवासी बसची तपासणी करण्यात आली असता, बसमधील आसनांच्या खाली लपवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील संशयित मावा आढळून आला. कारवाईदरम्यान अंदाजे २ ते ३ टन संशयित भेसळयुक्त मावा जप्त करण्यात आला. यावेळी ऋषिकेश तायडे आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्तेही उपस्थित होते. जप्त केलेल्या माव्याची गुणवत्ता, त्यामध्ये कोणत्या प्रकारची भेसळ आहे आणि तो मानवी आरोग्यास अपायकारक आहे का, याबाबत प्रयोगशाळेतील अहवालाची प्रतीक्षा आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ तसेच लागू असलेल्या इतर कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहिमा अधिक तीव्र केल्या असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या संशयास्पद वाहतूक किंवा विक्रीची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

