मुंबई : मोनोरेल गाड्यांची दुरवस्था, गाड्यांमधील तांत्रिक बिघाड आणि आर्थिक नुकसान यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) चेंबूर – संत गाडगे महाराज चौक मार्गिकेवरील मोनोरेल सेवा बंद करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार मोनोरेल शनिवारपासून धावणार नाही. मोनोरेल सेवा काही काळासाठी बंद करून त्यादरम्यान मोनोरेलचे अत्याधुनिकरण करणे आणि नवीन प्रणाली कार्यान्वित करण्याची कामे मार्गी लावली जाणार आहेत. त्यामुळे मोनोरेलमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना आता पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागणार आहे.
देशातील पहिली आणि एकमेव मोनोरेल मार्गिका म्हणून ओळखली जाणारी चेंबूर – संत गाडगे महाराज चौक मोनोरेल मार्गिका तोट्यात सुरू आहे. मोनोरेलचा उत्पन्न आणि खर्च यात मोठी तफावत आहे. सेवेत दाखल झाल्यापासून मोनोरेल अनेक वेळा विस्कळीत झाली होती. मोनोरेलवरील दुर्घटना आणि अपघातांचे सत्र कायम सुरू आहे. मोनोरेलला २०१७ मध्ये लागलेल्या मोठ्या आगीची घटना असो की ऑगस्ट २०२५ मध्ये कलंडलेल्या गाडीतून ५८८ प्रवाशांना गाडीचा दरवाजा तोडून बाहेर काढण्याची दुर्घटना असो, या दुर्घटनांमुळे मोनोरेल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोनोरेल सेवेबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.