वृत्तसंस्था : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यात भारताने इतिहासाला गवसणी घातली आहे. २००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली, २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप जिंकल्यानंतर आता २०२६ मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी २५६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव १५९ धावांवर आटोपला. यासह भारताने हा सामना ९६ धावांच्या फरकाने जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर पैशांचा पाऊस पाडला गेला आहे. तर उपविजेता न्यूझीलंडचा संघ देखील मालामाल झाला आहे.
आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी आयसीसीकडून बक्षिसासाठी एकूण १३.५ मिलियन डॉलर्स म्हणजे १२३.७७ कोटी रुपये रक्कमेची घोषणा करण्यात आली होती. ही रक्कम गेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील रकमेपेक्षा २० टक्के अधिक आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून जेतेपदाचा मान पटकावला होता. त्यावेळी भारतीय संघाला २.२४ मिलियन आणि अंतिम सामना गमावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला १.२८ मिलियन डॉलर्स इतकी रक्कम बक्षीस म्हणून दिली गेली होती. वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाला बक्षीस म्हणून ३ मिलियन डॉलर्स म्हणजे २७.४८ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले गेले आहेत. अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या न्यूझीलंड संघावरही पैशांचा पाऊस पाडला गेला आहे. उपविजेत्या न्यूझीलंड संघाला १.६ मिलियन डॉलर्स म्हणजेच १४.६५ कोटी रुपये दिले गेले आहेत. विजेत्या उपविजेत्या संघांसह सेमी फायनल गमावणाऱ्या संघांनाही बक्षिसाची रक्कम दिली गेली आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या दोन्ही संघांना ७,९०,००० डॉलर्स म्हणजे ७.२४ कोटी रुपये दिले गेले आहेत. या स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश करणाऱ्या पण सेमी फायनलमध्ये प्रवेश न करू शकलेल्या संघांना ३,८०,००० डॉलर्स म्हणजे ३.४८ कोटी रुपये दिले गेले आहेत. टी -२० वर्ल्डकप २०२६ या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या संघांना प्रत्येकी २,५०,००० डॉलर्स म्हणजे २.२९ कोटी रूपये मिळाले आहेत.

