पालघर : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने पालघर येथे अत्याधुनिक आधार सेवा केंद्र (Aadhaar Seva Kendra – ASK) सुरू केले असून, नागरिकांना आधारशी संबंधित सर्व सेवा आता एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. ‘डिजिटल इंडिया’ अभियानाला बळकटी देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले हे केंद्र महाराष्ट्रातील ११ वे आधार सेवा केंद्र असून, पासपोर्ट सेवा केंद्राच्या धर्तीवर त्याचे कामकाज होणार आहे. या केंद्रामध्ये एकाच वेळी चार आधार नोंदणी व अद्ययावतकरण संच कार्यरत राहणार असून, आधार नोंदणी, माहिती अद्ययावत करणे तसेच तक्रार निवारण यांसारख्या सेवा जलद आणि पारदर्शक पद्धतीने दिल्या जाणार आहेत. पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही महत्त्वाची सुविधा ठरणार असून, आधारसंदर्भातील विविध कामांसाठी इतर शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होणार आहे. या केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, नगराध्यक्ष उत्तम घरत, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी झाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, UIDAI मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे संचालक कर्नल अक्षय यादव तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सध्या पालघर जिल्ह्यात एकूण २३८ आधार केंद्रे कार्यरत असून, दरमहा सुमारे ४० हजार आधार नोंदणी आणि अद्ययावतकरणाची कामे केली जातात. रेल्वे स्थानकाजवळ सुरू करण्यात आलेले हे नवीन केंद्र आठवड्याचे सर्व दिवस नागरिकांच्या सेवेसाठी खुले राहणार आहे.
या आधार सेवा केंद्रामध्ये नवीन आधार नोंदणी, आधारमधील नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल अद्ययावत करणे, ५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचे मोफत अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (Mandatory Biometric Update – MBU), तसेच आधारसंबंधित तक्रारींचे जागेवरच निवारण अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी व्हीलचेअर, सुलभ प्रसाधनगृहे आणि सेवा सुरळीत पार पडाव्यात यासाठी स्वतंत्र आधार सेवा केंद्र व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली आहे. समान सेवा मानके, मजबूत डेटा सुरक्षा आणि वेळेवर तक्रार निवारण सुनिश्चित करण्यासाठी ही सर्व केंद्रे UIDAI मार्फत भागीदार संस्थांच्या माध्यमातून थेट चालवली जातात. याशिवाय, पुढील पिढीची डिजिटल ओळख अधिक सक्षम करण्यासाठी जिल्ह्यातील शाळांमध्ये विशेष बायोमेट्रिक अपडेट शिबिरांचे आयोजनही करण्यात येणार आहे. उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री गणेश नाईक यांनी नागरिकांनी विशेषतः ५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचे तसेच दीर्घकाळ बायोमेट्रिक अद्ययावत न केलेल्या नागरिकांनी अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट करून घ्यावे, असे आवाहन केले. अद्ययावत बायोमेट्रिक माहितीमुळे आधार प्रमाणीकरण अधिक अचूक होऊन शासकीय योजना, शिष्यवृत्ती, शैक्षणिक प्रवेश, बँकिंग सेवा, सामाजिक सुरक्षा योजना, सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि विविध डिजिटल सेवांचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. नागरिकांना आधार सेवांसाठी आगाऊ वेळ निश्चित करण्यासाठी UIDAI च्या अधिकृत अपॉइंटमेंट पोर्टलचा वापर करता येणार असून, केंद्राचे स्थान ‘भुवन आधार’ पोर्टलवरही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
UIDAI आधार सेवा केंद्राचे प्रमुख लाभ:
- नागरिकांना सर्व आधार सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध.
- आधुनिक संगणकीय सुविधा व प्रशिक्षित ऑपरेटरमार्फत जलद व गुणवत्तापूर्ण सेवा.
- आधार नोंदणी व माहिती अद्ययावत करण्यासाठी पारदर्शक आणि प्रमाणित प्रक्रिया.
- बायोमेट्रिक अद्ययावत करून आधार प्रमाणीकरणाची अचूकता वाढविणे.
- शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली अद्ययावत आधार माहिती उपलब्ध राहणे.
- ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व दिव्यांग नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर सेवा.
