मुंबई : मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आतापर्यंत कंपन्याच पुढे येत नसल्यामुळे मिठीची सफाईच्या कामापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. आजवर केलेल्या निविदा प्रक्रियेत एकही कंपनी पुढे येत नसल्याने हे पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत याचे काम करायचे का या विचारात असतानाच यासाठी अखेर महापालिकेला कंत्राटदार पावले. मिठी नदीच्या तीन भागातील कामांसाठी मागवलेल्या गाळ काढण्याच्या निविदेसाठी प्रत्येकी दोन कंपन्यांनी सहभाग नोंदवला असून ही निविदा तातडीने अंतिम करून शुक्रवार ते शनिवारपर्यंत कंत्राटदाराची निवड केली जाणार आहे. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पूर्ण क्षमतेने मिठीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची ग्वाही अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्थायी समितीत दिली.
मिठी नदीच्या कामासाठी यापूर्वी नेमलेल्या तीन पैकी दोन कंपन्यांवर गुन्हा दाखल असून एका कंपनीला कळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे मिठी नदीसह एस विभाग आणि एम पश्चिम विभागातील मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या वतीने जुन्या निवायदा अटी वगळून सुधारित अटीनुसार निविदा मागवण्यात आल्या होत्या.आजवर यासाठी मुदतवाढ देऊनही याला कोणत्याही कंपनीच्या वतीने प्रतिसाद दिला जात नव्हता.त्यामुळे अखेर पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या वतीने यांत्रिक सेवा भाडेतत्वावर तसेच रोजगार संस्थांकडून मनुष्यबळाची सेवा पुरवून ही सफाई पूर्ण करण्याचा विचार केला होता. मुंबईतील या नालेसफाई तसेच मिठी नदीच्या गाळाची सफाई कामांसंदर्भात पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत स्थायी समितीच्या सभेत सादरीकरण करण्यात आले. या सभेमध्ये मिठी नदीच्या कामासाठी मागवलेल्या निविदेसाठी मंगळवारी शेवटची तारीख होती. त्यामुळे सायंकाळी पर्यंत मिठी नदीच्या तीन भागातील कामांसाठी प्रत्येकी दोन कंपन्यांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. त्यामुळे लवकरच या निविदा खुल्या करून अत्यंत तातडीने याची पुढील प्रक्रिया करून पात्र कंत्राटदारांची निवड केली जाईल. त्यामुळे शनिवारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि प्रत्यक्षात १ एप्रिलपासून कामाला सुरुवात करून प्रत्यक्षात ४ ते ५ तारखेपासून पूर्ण क्षमतेने सफाईच्या कामाला सुरुवात होईल असा विश्वास बांगर यांनी व्यक्त केला.

