शाहरुख खानचा मुंबईतील ‘मन्नत’ बंगला नेहमीच लोकांचं आकर्षण असतो. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी रोज मन्नतच्या बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी असते. अनेक लोक मन्नतच्या नेमप्लेटजवळ उभे राहून फोटो काढतात. शाहरुख आणि त्याचा कुटुंब सालोंपासून या बंगल्यात राहात आहेत. आता शाहरुख आणि गौरी खान यांनी हा बंगला आणखी भव्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
शाहरुख आणि गौरी मन्नत बंगल्याला आणखी आलिशान बनवण्याच्या तयारीत आहेत. टाइम्स नाऊच्या अहवालानुसार, शाहरुख आणि गौरी यांनी गेल्या महिन्यात महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीकडे एक अधिकृत अर्ज केला आहे, ज्यामध्ये त्यांनी मन्नत बंगल्यावर आणखी दोन मजले बांधण्याची परवानगी मागितली आहे. एमसीझेडएमएने या अर्जावर नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चा केली. जर शाहरुखला परवानगी मिळाली, तर यासाठी अंदाजे २५ कोटी रुपयांचा खर्च येईल.
मन्नत बंगला एक ऐतिहासिक संपत्ती आहे. १९१४ साली हा बंगला बांधला गेला होता. त्यामुळे त्यात कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते. मन्नत बंगला २०११.३८ स्क्वेअर मीटर क्षेत्रफळात पसरला आहे. तो सहा मजली बंगला आहे आणि आता त्यात आणखी दोन मजले वाढवण्याची योजना आहे.
शाहरुख खानने २००१ साली ‘मन्नत’ बंगला विकत घेतला होता. त्यावेळी त्याची किंमत १३ कोटी रुपये होती. तेव्हा बंगल्याचं नाव ‘विला विएना’ असं होतं. ‘येस बॉस’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान शाहरुखला हा बंगला पाहायला मिळाला होता. मन्नत खरेदी केल्यानंतर गौरीने त्याचं इंटिरियर डिझाइन केलं आणि त्याचं नाव बदलून ‘मन्नत’ ठेवलं. आज त्या बंगल्याची किंमत सुमारे २०० कोटी रुपये आहे.