बदलापूर : नव्याने खरेदी केलेल्या घराची घरपट्टी लावण्याकरता लाचेची मागणी केल्याबद्दल बदलापूरजवळील वांगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता आढाव यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराकडून त्यांनी २० हजारांची मागणी केली होती. दहा हजार रुपये स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले होते. मात्र संशय आल्याने महिला सरपंचाने लाच स्वीकारली नाही. लाच मागितल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील तक्रारदार यांनी वांगणी येथे नवीन घर खरेदी केलेले होते. त्याची घरपटट्टी लावण्याकरीता वांगणीच्या सरपंच वनिता आढाव यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदार यांना लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी १३ नोव्हेंबर २०२४ रोजी वनिता आढाव लाचेची मागणी करीत असल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार नोंदवली. त्याप्रमाणे २६ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये सरपंच वनिता आढाव यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करुन तडजोडीअंती १० हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. त्यानंतर सर्व कायदेशिर बाबींचे अवलंब करुन तक्रारदार सरपंचांना लाचेची रक्कम देण्याकरीता गेल्या असता त्यांना काहीतरी संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्विकारली नाही. मात्र लाचेची मागणी करून ती स्विकारण्याची तयारी दाखवल्याने त्यांच्यावर कुळगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.