ठाणे : गेले काही वर्षांपासून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. या सायबर गुन्ह्यांचा तपास करत असताना, गुन्हेगार गुन्ह्यांतील रक्कमेचा क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातून अपहार करत असल्याचे आढळून येते. त्यामुळे अपहारित रक्कमेचा माग काढणे आणि ती रक्कम हस्तगत करणे पोलिसांना अवघड जात आहे.
यासाठी क्रिप्टोकरंसी संबधीत तज्ज्ञांची आवश्यकता लक्षात घेवून ठाणे शहर पोलीस आयुक्त यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात प्रथमच सायबर पोलीस ठाणे येथे ‘क्रिप्टोकरंसी अन्वेषण कक्षाची’ स्थापना केली आहे. महाराष्ट्रातील हे पहिले क्रिप्टोकरंसी अन्वेषण कक्ष असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तालयातून देण्यात आली. अलीकडच्या काळातील सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ठाणे शहर पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून ठाणे पोलीस आयुक्तालयात होणाऱ्या सायबर गुन्ह्यांचे तपासासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात यापूर्वी सायबर कक्ष स्थापन करण्यात आला आहे. परंतू, या गुन्ह्यांच्या तपासासाठी सायबर तज्ज्ञ आवश्यक असल्याची बाब लक्षात घेवून त्यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन सायबर तज्ज्ञांची नेमणूक केली. परंतू, या सायबर गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांच्या लक्षात आले की, गुन्हेगार गुन्ह्यांतील रक्कमेचा क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातून अपहार करत आहे. त्यामुळे पुढील कारवाई करण्यास अडथळा निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे पोलिस आयुक्तालयात सायबर पोलीस ठाणे येथे ‘क्रिप्टोकरंसी अन्वेषण कक्षाची’ स्थापना ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.