नवी मुंबई : सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा लांबणीवर पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ती ७ जून रोजी जाहीर केली होती. त्यानुसार संबंधित विभागाने तयारीही केली होती. मात्र, ३१ मेपासून विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता घरांची सोडत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सिडकोने आपल्या पोर्टलवर याबाबतची सूचनाही प्रसारित केली आहे. त्यामुळे या गृहयोजनेत अर्ज केलेल्या ग्राहकांना सोडतीसाठी आणखी एक महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गेल्या पाच वर्षांत सिडकोने विविध घटकांसाठी विविध गृहयोजनांच्या माध्यमातून जवळपास तीस हजार घरांची योजना जाहीर करून त्यांची संगणकीय सोडत काढली आहे. मात्र, विविध कारणांमुळे हजारो घरे विक्रीविना पडून आहेत. विशेष म्हणजे, यातील सर्वाधिक घरे तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये आहेत. त्यापैकी ३,३२२ घरांची योजना प्रजासत्ताक दिनी जाहीर केली आहे. या घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १६ एप्रिल होती. तर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार संगणकीय सोडतीसाठी १९ एप्रिलचा दिवस निश्चित केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे १९ एप्रिलची पूर्वनियोजित सोडत पुढे ढकलून ७ जूनचा मुहूर्त निश्चित केला. आता निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल केली असली तरी विधान परिषदेच्या कोकण, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीची आचारसंहिता ५ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे घरांची संगणकीय सोडत त्यानंतरच म्हणजेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात काढली जाईल, असे सिडकोने स्पष्ट केले आहे.