मुंबई : आशिया खंडातील पहिल्या महिला रेल्वे चालक म्हणून सुरेखा यादव यांना नवी दिल्ली येथे ९ जून रोजी पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण मध्य रेल्वे आणि महिला कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मूळच्या साताऱ्यातील सुरेखा यादव यांनी आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक म्हणून नावलौकीक मिळविला आहे. रेल्वेच्या सेवेत त्या तीन दशकांपासून आहेत. महिला विशेष लोकल, डेक्कन क्वीन याचे सारस्थ त्यांच्या हाती होते. त्याचबरोबर घाट भागातील आणि मालगाड्याच्या इंजिनाचे सहाय्यक चालक आणि चालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तसेच त्यांनी कल्याण येथील मोटरमन केंद्रात भावी मोटरमनना प्रशिक्षण देण्याचे कामही केले आहे. सध्या मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या सारथ्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
देशातील नागरिकांचे ९ जून रोजी पार पडणाऱ्या पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याकडे लक्ष लागले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर या शपथविधी सोहळ्याला येणार आहे. तर, या सोहळ्याचे आमंत्रण देशभरातील वंदे भारतच्या चालकांना देण्यात आले आहे. यामध्ये प्रिती साहू, श्रीणी श्रीवास्तव, ऐश्वर्या मेनन, एएसपी तिर्के, स्नेह सिंग बघेल, एन. पारेख, ललिथा कुमार, सुरेंद्र पाल सिंग, सत्य राज मंडल यांचा समावेश आहे. तसेच मध्य रेल्वेमधील वंदे भारतच्या महिला चालक सुरेखा यादव यांचाही त्यात समावेश आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या शपथविधी सोहळ्याला आमंत्रित केल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही, असे सुरेखा यादव यांनी सांगितले.