पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दहा आरोपींची पोलिसांकडून कारागृहात जाऊन एकत्रितपणे चौकशी केली जाणार आहे. याबाबत तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी न्यायालयात अर्ज केला असून, विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी पोलिसांना चौकशी करण्यास परवानगी दिली आहे. अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. मुलाच्या रक्ताच्या नमुने बदल प्रकरणात विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, पत्नी शिवानी (दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डाॅ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार करणारे अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, मोटारीतील सहप्रवासी मुलांच्या रक्ताच्या नमुन्यात बदल करणारे आदित्य अविनाश सूद (वय ५२, रा. बंगला क्रमांक ३, सोपानबाग सोसायटी, घोरपडी), आशिष सतीश मित्तल (वय ३७, रा. बेलवेडर सोसायटी, विमाननगर) आणि अरुणकुमार सिंग यांना अटक करण्यात आली होती. आरोपी सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणात नऊ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपी आशिष मित्तलला रक्ताचे नमुने देण्यास सांगणारा अरुणकुमार देवनाथ सिंग याच्याविरोधात अद्याप आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सर्व आरोपींच्या विरोधात एकत्रित खटला चालविला जाणार आहे.
अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट करण्यासाठी डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना किती रक्कम दिली जाणार होती, तसेच आरोपींनी त्यांना काही आमिष दाखविले होते का? यादृष्टीने तपास करायचा आहे. सर्व आरोपींची येरवडा कारागृहात एकत्रित चौकशी करायची आहे, असा अर्ज न्यायालायत दाखल करण्यात आला.