वृत्तसंस्था : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला महागाईचा आणखी एक मोठा धक्का बसला आहे. इराण-इस्रायल संघर्षात मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानमध्येच कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि रॉकेलच्या किंमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. डिझेलचे दर आता ५२० रुपये (PKR) प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर पेट्रोलने सुद्धा ४५० रुपयांचा (PKR) टप्पा ओलांडला आहे. केवळ पेट्रोल आणि डिझेलच नाही, तर पाकिस्तान सरकारने केरोसीनच्या किमतीतही मोठी वाढ केली आहे. केरोसीनचे दर ४५७.८० रुपये प्रति लिटर करण्यात आले आहेत.
पाकिस्तानमध्ये महागाईने उच्चांक गाठला असून आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एकाच वेळी मोठी वाढ केली आहे. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती दोन वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. पाकिस्तानकडे सध्या अत्यंत मर्यादित इंधन साठा शिल्लक आहे. माहितीनुसार, देशात केवळ २८ दिवस पुरेल इतकाच पेट्रोल-डिझेलचा साठा असून कच्च्या तेलाचा साठा फक्त १० दिवसांचा आहे. देशातील बिघडलेली आर्थिक स्थिती आणि चलनाचे घसरलेले मूल्य यामुळे इंधन आयातीवर मोठा परिणाम झाला आहे.

