वृत्तसंस्था : १ एप्रिल २०२६ पासून नवीन पॅनकार्ड (PAN Card) काढण्यासाठी किंवा जुन्या पॅनमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आता केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही. आयकर विभागाने लागू केलेल्या नवीन नियमांनुसार, आता अर्जदारांना जन्मतारखेचा (Date of Birth) पुरावा म्हणून स्वतंत्र अधिकृत कागदपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आता जन्मतारखेचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र द्यावे लागेल.
जन्मतारखेसाठी अतिरिक्त कागदपत्रे :
-
- जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)
- १० वीचे प्रमाणपत्र किंवा मार्कशीट (SSC Certificate)
- पासपोर्ट (Passport)
- ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License)
- मतदार ओळखपत्र (Voter ID)
पॅनकार्डवर असणारे नाव आता आधार कार्डवरील नावाप्रमाणेच (Exact Match) असणे बंधनकारक आहे. दोन्ही कागदपत्रांवरील नावात थोडाही फरक असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. पॅनकार्डसाठीचे जुने फॉर्म (उदा. Form 49A) आता बंद झाले असून, त्यांच्या जागी नवीन फॉर्म (Form 93 आणि Form 95) सुरू करण्यात आले आहेत. केवळ आधार आधारित ई-पॅनची (Instant E-PAN) सुविधा अजूनही काही अटींसह उपलब्ध असली, तरी नियमित अर्जांसाठी आता अधिक कडक पडताळणी केली जाणार आहे. जर तुमचे पॅनकार्ड अजूनही आधारशी लिंक नसेल किंवा नावामध्ये तफावत असेल, तर ते तातडीने अपडेट करणे आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात.

