पुणे : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईने नुकतेच वसतिगृह क्रमांक ४ मध्ये अत्याधुनिक भोजनगृहाचे उद्घाटन केले. या भोजनगृहाला आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी, देशातील जेष्ठ उद्योजक आणि भारताचे ‘इथेनॉल मॅन’ म्हणून लोकप्रिय असणारे पुण्यातील उद्योगपती डॉ. प्रमोद चौधरी यांचे नाव देण्यात आले.आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी निवेदनाद्वारे ही माहिती दिली.
आयआयटी मुंबईच्या १९७१ च्या बी. टेक. तुकडीचे माजी विद्यार्थी असलेल्या डॉ. प्रमोद चौधरी यांच्या सन्मानार्थ भोजनगृहाला त्यांचे नाव देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘विद्यार्थीदशेत वसतिगृह ४ मध्ये राहिलेल्या डॉ. प्रमोद चौधरी यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्यपूर्ण सहभाग नोंदवला. त्यांनी संस्थेच्या धोरणांना, उपक्रमांना कायमच पाठबळ दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत वसतिगृह ४ मधील भोजनगृहाला त्यांचे नाव देण्यात आले. आयआयटी मुंबईबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचे आणि जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या संस्थेप्रतीच्या चौधरी यांच्या कृतज्ञतेचा हा गौरव आहे,’ अशी भावना प्रा. शिरीष केदारे यांनी व्यक्त केली.

