वृत्तसंस्था : अॅपल कंपनी पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांसाठी नवा सरप्राईज घेऊन येत आहे. ॲपल उद्या ९ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजता iPhone 17 आणि iPhone 17 Pro सीरीजचे अनावरण करणार असून, या लाँचिगकडे ग्राहकांचे लक्ष वेधले गेले आहे. यावेळी कंपनीकडून केवळ आयफोनच नव्हे तर नवीन एअरपॉड्स आणि अॅपल वॉच देखील बाजारात आणले जाण्याची शक्यता आहे. आयफोन १७ लाइनअपमध्ये यूजर्सना अनेक नवे फिचर्स अनुभवायला मिळतील. यात Apple Intelligence, सुधारित फ्रंट कॅमेरा लेन्स, अधिक सामर्थ्यवान प्रोसेसर आणि iOS 26 संबंधी अपडेट्सचा समावेश असेल. कंपनीने यावेळी चार मॉडेल्स सादर करण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे आयफोन १७ प्लसच्या जागी आयफोन १७ एअर सादर केला जाऊ शकतो. हा एअर व्हर्जन अल्ट्रा थिन डिझाइनसह येईल, ज्यात स्लिम बॉडी आणि सिंगल रियर कॅमेरा असणार असल्याचे लीक झालेल्या रेंडर्समध्ये दिसून येत आहे.
आयफोन १७ चे डिझाइन मागील आवृत्ती म्हणजे आयफोन १६ प्रमाणेच असेल. यात ६.३ इंचाचा १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आणि २४ एमपी फ्रंट कॅमेरा असेल. या हँडसेटमध्ये A19 चिपसेटचा वापर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी किंमत वाढण्याची शक्यता असून आयफोन १६ ची सुरुवातीची किंमत ७९९ डॉलर्स (भारतामध्ये ७९,९९० रुपये) होती. आयफोन १७ ची अधिकृत किंमत लाँचिंगच्या वेळी जाहीर होईल. दुसरीकडे, आयफोन १७ प्रोमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे. या तिन्ही लेन्स ४८-४८ एमपी सेन्सर असलेल्या असतील. प्रो मॉडेलमध्ये ए१९ प्रो चिपसेटचा वापर केला जाणार असून हा प्रोसेसर गेमिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि उच्चस्तरीय परफॉर्मन्ससाठी खास तयार करण्यात आला आहे.