नवी मुंबई : नेरूळमधील करावे गावात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या पुरुष आणि तीन महिला अशा चार बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून अटक केली. हे चारही बांगलादेशी नागरिक मागील पाच वर्षांपासून नवी मुंबईत बेकायदेशीररीत्या राहत होते. त्यांनी भारतातील आधार कार्ड आणि पॅन कार्डही बनवून घेतल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्याविरोधात पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.
नेरूळमधील करावेमध्ये राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांबद्दल अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहायक पोलिस निरीक्षक अलका पाटील, पोलिस उपनिरीक्षक भरगुडे यांच्यासह पथकाने तांडेल निवास इमारतीमध्ये छापा टाकला. त्यावेळी रुकसाना नुरूल इस्लाम शेख (३५), पिंकी तारीक शेख (२७), उंजिला खातून परवेल शेख (२७) व रॉनी नुरुल इस्लाम शेख (३०) या तीन महिला, एका पुरुषाला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी भारतात घुसखोरी केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.