SPORTS : चेस ऑलिम्पियाड 2024 मध्ये सहभागी झालेल्या पुरुष आणि महिलांच्या भारतीय संघाने स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. 45 व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच भारताने या स्पर्धेत सुवर्ण पदकाची कामगिरी केली. अंतिम फेरीमध्ये भारताच्या पुरुष संघाने स्लोव्हेनियाचा 3.5 – 0.5 ने पराभव केला तर महिला संघाने देखील अझरबैजानचा पराभव केला. यापूर्वी भारताच्या पुरुष संघाने 2014 आणि 2022 चेस ऑलिम्पियाडमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं, तर महिलांनी 2022 मध्ये चेन्नईमध्ये झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं होतं. परंतु यंदा प्रथमच सुवर्ण पदकाला गवसणी घातल्याने खेळाडूंचा आनंद गगनात मावत नव्हता. यावेळी त्यांनी विजेतेपदाची ट्रॉफी उंचावताना रोहित शर्मा स्टाईल सेलिब्रशन केले.
चेस ऑलिम्पियाड 2024 जिंकल्यावर भारताचा पुरुष आणि महिला संघ मंचावर हातात तिरंगा घेऊन उभा होता. यावेळी तानिया सचदेव आणि डी गुकेश यांनी ट्रॉफीसह रोहित स्टाईल आयकॉनिक वॉक करत सेलिब्रेशन केलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 2022 मध्ये मेस्सीने सुद्धा फिफा वर्ल्ड कप जिंकल्यावर असे सेलिब्रेशन केले होते.
भारताकडून डी गुकेशनेने चेस ऑलिम्पियाड 2024 मध्ये दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. गुकेशने त्याच्या 10 सामन्यांपैकी 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला तर एक सामना ड्रॉ झाला. तर पुरुषांमध्ये भारताच्या अर्जुन एरिगाईसीने सुद्धा 11 सामन्यांपैकी 10 सामन्यात विजय मिळवून त्याची सुद्धा सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषणा करण्यात आली. तर महिलांमध्ये हरिका द्रोणवल्ली, वैशाली रमेशबाबू, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल, तानिया सचदेव आणि अभिजित कुंटे यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाने चेस ऑलिम्पियाडमध्ये दुसरं सुवर्ण पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली.