मनोरंजन : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी कंगना बराच काळ लढा देत होती. ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वाद सुरु झाला होता. त्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. अशातच आता चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळाले आहे. खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
कंगनाने तिच्या एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘इमर्जन्सी’ चित्रपटासंबंधी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने आनंद व्यक्त केला आहे. कंगनाने एक्स अकाऊंटवर, ‘आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की आम्हाला आमच्या इमर्जन्सी चित्रपटासाठी सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले आहे. आम्ही लवकरच प्रदर्शनाची तारीख जाहीर करू. आपल्या संयम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद’ या आशयाची पोस्ट शेअर केली आहे. कंगनाच्या या पोस्टमध्ये आनंद स्पष्ट दिसत आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट ट्विटरवर वेगाने व्हायरल होत आहे.
कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट आधी ६ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार होता. पण त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली. कारण चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर शीख संघटनांनी त्याला विरोध केला होता. त्यानंतरच या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. शिख समुहाने चित्रपटावर आरोप केले होते की, त्यांच्या समाजाची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आली आहे. त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून चित्रपटावरून वाद निर्माण झाला होता. आता अखेर चित्रपटाला हिरवा कंदील देण्यात आला आहे.
‘इमर्जन्सी’ हा एक पीरियड ड्रामा आहे. यामध्ये २५ जून १९७५ रोजी देशात सुरू झालेली आणीबाणीची परिस्थिती दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना रणौत स्वत: करणार आहे. ती या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रेयस तळपदे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अनुपम खेर हे जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहेत. आता संजय गांधी यांच्या भूमिकेत अभिनेता विशाक नायर दिसणार आहेत.