मुंबई : वेस्टर्न रेल्वेने वांद्रे टर्मिनसवरील प्रवाशांची वाढती गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आणि प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील प्रमुख रेल्वे स्थानकांच्या धर्तीवर आता वांद्रे टर्मिनस येथे ३,७०० प्रवाशांची क्षमता असलेला अत्याधुनिक ‘होल्डिंग एरिया’ उभारण्यात येत आहे. सुमारे ₹१६.४३ कोटी खर्चाच्या या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, मुख्य प्रवेशद्वार आणि पार्सल कार्यालयासमोरील सध्याच्या पार्किंगच्या जागेवर बांधकाम सुरू करण्यात आले आहे. सुमारे २,६२५ चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारल्या जाणाऱ्या या सुविधेमुळे प्लॅटफॉर्मवरील अनावश्यक गर्दी कमी होऊन प्रवाशांना अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने रेल्वेत प्रवेश करता येणार आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये वांद्रे टर्मिनसवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. वांद्रे टर्मिनसवरून दररोज सुमारे ४० हजार प्रवासी आणि २२ लांब पल्ल्याच्या गाड्या सुटत असल्याने विशेषतः सणासुदीच्या काळात गर्दीचे मोठे आव्हान निर्माण होते.
या आधुनिक होल्डिंग एरियामध्ये ‘थ्री-झोन’ प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. प्री-तिकिटींग झोनमध्ये बसण्यासाठी ४५ थ्री-सीटर बाकडी, प्रवासी माहिती दर्शविणाऱ्या डिजिटल स्क्रीन, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वॉटर कुलर आणि स्वच्छतागृहे उपलब्ध असतील. तिकिटींग झोनमध्ये ८ अनारक्षित तिकीट (UTS) काउंटर, १० वर्कस्टेशन्स आणि ६ ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स (ATVM) बसवण्यात येणार आहेत. तसेच प्रवासी वाहतूक कॉरिडॉरद्वारे तिकीट तपासणीनंतर प्रवाशांना थेट आणि शिस्तबद्ध पद्धतीने प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जाणार आहे. या सुविधेमुळे विशेषतः दिवाळी, छठ पूजा आणि इतर सणांच्या काळात उत्तर भारतात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, प्लॅटफॉर्मवरील गर्दी, गोंधळ आणि अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होईल. आधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि प्रभावी गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने वेस्टर्न रेल्वेचा हा प्रकल्प मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
