पुणे : जयपूरमधील केसन फार्मा कंपनीच्या खोकल्याच्या औषधांमुळे (कफ सिरप) मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर केसन कंपनीच्या खोकल्याच्या औषधांचा वापर तत्काळ बंद करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. तसेच, औषध विक्रेते आणि वितरकांकडून या कंपनीच्या औषधांच्या साठ्याबाबत माहिती घेण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सहआयुक्त गिरीश हुकरे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. त्यांनी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील औषध विक्रेते संघटनांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० व त्याअंतर्गत नियम १९४५ नुसार हे पत्र पाठविण्यात येत आहे. जयपूरमधील केसन फार्मा कंपनीच्या कोल्डरीप, नेक्स्ट्रो-डीएस सिरप या खोकल्याच्या औषधांमुळे राजस्थान आणि मध्य प्रदेशात बालकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यामुळे या कंपनीच्या औषधांचा साठा असल्यास त्याचा वापर तत्काळ बंद करावा. या साठ्याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाला कळवावी.
लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी खोकल्यावरील औषधे आणि सर्दीवरील औषधांच्या वापराबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लहान मुलांना ही औषधे देताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की, दोन वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधे देऊ नयेत. तसेच, पाच वर्षांखालील मुलांसाठी ही औषधे सामान्यतः शिफारस केलेली नाहीत. कारण, लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात आणि त्यासाठी औषधांची गरज पडत नाही.