मुंबई : राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे आणि अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने कठोर नियमावली लागू केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि कोणालाही कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
राज्यातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे या उद्देशाने ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. अलीकडील तपासण्यांमध्ये अनेक हॉटेल्स आणि खाद्य व्यवसायांमध्ये अस्वच्छ स्वयंपाकगृहे, वापरलेल्या तेलाचा वारंवार वापर तसेच निकृष्ट दर्जाच्या पॅकेजिंगचा वापर आढळून आल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. नव्या नियमांनुसार प्रत्येक हॉटेल आणि रेस्टॉरंटने ग्राहकांना सुरक्षित व पिण्यायोग्य पाणी मोफत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ग्राहकांना मोफत पाणी उपलब्ध असल्याची माहिती देणारा फलक दर्शनी भागात लावणेही बंधनकारक करण्यात आले आहे. ग्राहकाच्या स्पष्ट मागणीनंतरच बाटलीबंद पाणी पुरवता येणार आहे. याशिवाय ग्राहकांसाठी स्वच्छ पाणी, हात धुण्याची सुविधा, साबण आणि स्वच्छ टॉवेल उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वयंपाकगृहांच्या स्वच्छतेबाबतही प्रशासनाने कठोर निकष निश्चित केले आहेत. किचनमधील भिंती आणि फरशी स्वच्छ धुता येण्याजोग्या असाव्यात तसेच तेथे पुरेशी हवा खेळती राहण्यासाठी योग्य व्यवस्था आणि धूर बाहेर काढणारी यंत्रणा असणे आवश्यक आहे. कच्चा माल आणि तयार अन्नपदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणे, तसेच शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थांची स्वतंत्र साठवणूक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. किचनमध्ये माशा, झुरळे, पाल किंवा उंदरांचा वावर आढळू नये यासाठी नियमित कीटकनियंत्रण करणे आणि आवश्यक साधने बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा मानकांनुसार नोंदणी करून नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने या नियमांचे पालन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

