मुंबई : अंधेरी पूर्व व पश्चिम परिसर जोडणाऱ्या गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून १ जुलै रोजी या दोन पुलावरून वाहतूक सुरू होणार आहे. गोखले पुलाच्या पुनर्बांधणीनंतर बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यांच्यातील तफावत दूर करण्यासाठी बर्फीवाला पुलाचा भाग जॅकने उचलून गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपूलाच्या समांतर पातळीवर जुळवण्याचे आव्हानात्मक काम मुंबई महानगरपालिकेने नुकतेच पूर्ण केले. कॉंंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर १ जुलै रोजी जुहू – अंधेरी दरम्यान वाहतूक बर्फीवाला पुलावरून सुरू करण्यात येणार आहे. गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाली. मात्र अंधेरी पश्चिम दिशेला असलेला बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यांची पातळी वरखाली झाली होती. त्यामुळे बर्फीवाला पूल बंदच ठेवावा लागला होता. तसेच या दोन पुलांमध्ये अंतर पडल्यामुळे मुंबई महापालिकेवर टीकाही झाली. गोखले पूल व बर्फीवाला पूल जोडण्यासाठी पालिका प्रशासनाने मुंबई आयआयटी आणि व्हिजेटीआय या संस्थांची मदत घेतली. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार हे दोन पूल जोडण्यासाठी जॅक लावून पुलाचा काही भाग वर खेचून पातळी समतल करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेकडून वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय) तसेच तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली गोखले पुलाचे काम सुरू आहे. हे काम नियोजित वेळापत्रकानुसार सुरू असून १ जुलैपासून या दोन पुलांवरून वाहतूक सुरळीत सुरू होईल, अशी ग्वाही पालिका प्रशासनाने दिली.
या कामाअंतर्गत सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग एका बाजूला १,३९७ मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजुला ६५० मिमी वर उचलण्यात आला आहे. या जोडणीच्या कामासाठी जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असणारे सूक्ष्मस्तरीय नियोजन आणि अथक प्रयत्नांना या महत्त्वाच्या टप्प्यात यश आले आहे. या कामाची काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पाहणी केली होती. तसेच ही कामे नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी सूचना दिल्या होत्या. दोन्ही पुलांच्या जोडणीसाठी आवश्यक असणाऱ्या स्टिचिंगच्या काँक्रिटीकरणाचे काम झाल्यानंतर त्यापुढील सलग सहा तास पाऊस न पडणे अपेक्षित व आवश्यक होते. मात्र सध्या पाऊस पडत नसल्यामुळे काँक्रिटीकरणाचे व स्टिचिंगचे काम विनाअडथळा करणे शक्य झाले. वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय), आय.आय.टी. आणि स्ट्रक्ट्रॉनिक्स कन्सलटिंग इंजिनिअर्स या तांत्रिक सल्लागारांच्या देखरेखीखाली हे आव्हानात्मक काम पार पाडण्यात आले. या कामानंतर पुलावर २४ तासांच्या कालावधीत स्थिरता चाचणी म्हणजेच ‘लोड टेस्ट’ करण्यात येईल. त्यानंतर पूल वाहतुकीसाठी खुला होईल.