नवी मुंबई : सुपारी, संगणक आणि त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा विदेशी सिगारेटचा साठा जप्त करीत सीमा शुल्क विभागाने तस्करावर सलग तिसरी कारवाई केली आहे. त्यामुळे जेएनपीए बंदरातील आयात-निर्यात होणाऱ्या बंद खोक्यांत तस्करीच्या मालाची वाढ झाली आहे असे चित्र समोर येत आहे. अगदी जलद, स्वस्त व किफायतशीर माल वाहतूक म्हणून जलमार्गाने बंदरातून होणारा व्यवसाय सध्या जगाच्या दळणवळणाचे मुख्य साधन बनले आहे. पुढील वर्षी देशातील वर्षाला एक कोटीपेक्षा अधिक कंटेनर मालाची हाताळणी करणारे बंदर होणार आहे. मात्र हेच बंदर वाढत्या तस्करीमुळे तस्करीचा अड्डा बनू लागले आहे. मागील आठवडाभरात बंदरातून आयात करण्यात आलेल्या तीन कारवायांत एकूण २५ कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या सुपारी, संगणक आणि सिगारेट यांच्या तस्करीची प्रकरणे उघडकिस आली आहेत. यापूर्वी घातक शस्त्र, रक्तचंदन त्याचप्रमाणे प्रतिबंधित ई सिगारेट सीमा शुक्ल विभागाने पकडुन ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे या वाढत्या तस्करीमुळे बंदरातून आयात-निर्यात होणाऱ्या कंटेनरच्या खोक्यांत दडलेय काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यापूर्वी बंदरातून कंटेनरमधून आयात-निर्यात करण्यात येणारे हजारो कोटींचे हजारो टन वजनाचे रक्तचंदन, घातक शस्त्रे व इतर वस्तूंचीही तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र तरीही बंदरातून सुरू असलेल्या तस्करीवर मागील ३५ वर्षांत नियंत्रण येऊ शकलेले नाही. उलट यामध्ये वाढच झाली आहे. दोन दिवसांपूर्वी विदेशातून तस्करीच्या मार्गाने कोट्यवधींचा कर चुकवून भारतात आणण्यात आलेली ९ कोटी ६३ लाख किमतीची १८९.६ मेट्रिक टन सुपारी न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. ‘बिटुमेन ग्रेड ६०/७०’ अशा चुकीच्या नावाखाली आयात मालाचे दस्तऐवज तयार करण्यात आले होते. कंटेनर स्कॅनिंगमध्ये कंटेनर स्कॅनिंग डिव्हिजनच्या सतर्क अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर संशयित नऊ कंटेनर रोखून ठेवले होते. त्यातील मालाची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीत बिटुमेन ड्रम्सच्या मागे काळ्या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या लाकडी पॅलेटमध्ये तस्करीच्या मार्गाने बेमालूमपणे लपविलेला १८९.६ मेट्रिक टन सुपारीचा साठा आढळला आहे. या प्रकरणी आयात मालाची चुकीची घोषणा करणाऱ्या कंपनीच्या एका संचालकालाही विभागाने अटक केली आहे. अवैध गुटखा उद्याोगाला पुरवठा करण्यासाठी सुपारीची विदेशातून भारतात तस्करी केली जाते. या तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतातील उत्पादकांच्या संरक्षणासाठी आयात सुपारीवर ११० टक्के कराची आकारणी केली जाते. मात्र त्यानंतरही आयातदार तस्करीच्या मार्गाने बनावट मालाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सुपारीची आयात करीत आहेत. जेएनपीएमधल्या सहा खासगी बंदरांतून दररोज १५ हजारपेक्षा अधिक कंटेनरची हाताळणी केली जात आहे. या कंटेनरची तपासणी केली जाते. मात्र तरीही या कंटेनरमधून विविध प्रकारच्या वस्तूंच्या आड ही तस्करी केली जात आहे. त्यामुळे जेएनपीए बंदर परिसरात तस्करांचा टोळ्या सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.