मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाड्यांवर आतील आणि बाहेरील भागात विविध कंपन्यांच्या जाहिरात करून चालू आर्थिक वर्षात ८.३८ कोटी रुपयांची कमाई केली आहे तर स्थानक परिसर, स्थानकांव्यतिरिक्त परिसरात जाहिरातबाजी करून आणि रेल्वे स्थानकावरील डिजी लॉकर, विद्युत वाहनांसाठी चार्जिंग पॉइंट, स्लीपिंग पॉड्स या प्रवासीभीमुख सुविधेतून ६५.४७ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे.
भारतीय रेल्वेत महसूल वाढविण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम आणली आहे. यामार्फत महसूल वाढविण्यासाठी अनेक योजना राबवणे सुरू आहे. रेल्वे गाड्या, स्थानके तसेच इतर ठिकाणी जाहिरातींसाठी जागा भाड्याने देणे यांसारख्या भाडेतत्त्वावरील उपक्रमांमधून महसूल मिळविला जात आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात महसुलात २ टक्क्यांची वाढ झाली आहे. रेल्वे प्रवासात, रेल्वे स्थानकात मौल्यवान वस्तू चोरीला जाणाऱ्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. यांसह रेल्वे स्थानकावर इच्छित गाडी येण्यास विलंब असेल आणि प्रवाशांकडे मौल्यवान सामग्री कुठे ठेवायचे, असा प्रश्न प्रवाशांना पडतो. त्यासाठी मध्य रेल्वेने लॉकरची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. सीएसएमटी, दादर, एलटीटी, कल्याण येथे डिजी लॉकरची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. तसेच वुलू, डिजी लॉकर्स इत्यादी विविध उपक्रमांद्वारे जाहिरात करून, १.२६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.