Breastfeeding : महिलांमधील स्तनपानाचा दर वाढावा यासाठी संयुक्त राष्ट्र वार्षिक मोहीम राबवत आहे. स्तनदा मातांना आपल्या बाळाला स्तनपान करण्यास प्रोत्साहित करावं यासाठी जगातील सर्व देशांनी प्रयत्न करावेत असं आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केलं आहे. या मोहिमअंतर्गत असं सांगण्यात आलंय की, ज्या माता बालकांना स्तनपान करत नाहीत, त्या बालकांचा एका वर्षात मृत्यू होण्याचा धोका 14 पटीने वाढतो. आई होणाऱ्या महिलांना पगारी प्रसूती रजा द्यावी, कार्यालयात काम करताना स्तनपानासाठी वेळ द्यावा असं आवाहन संयुक्त राष्ट्राकडून करण्यात येत आहे.
सोबतच कार्यालयांमध्ये काही खोल्या उपलब्ध करून द्याव्यात, जिथे आई आपल्या मुलांना स्तनपान करू शकेल किंवा दूध पाजू शकेल. स्तनपानाशी संबंधित आजही काही गैरसमजुती आहेत. यामुळे अनेक स्त्रिया आपल्या मुलांना स्तनपान करणं टाळतात. हे समज आणि गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही दोन तज्ज्ञांशी संपर्क साधला. कॅट्रिओना वाएट या ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल मध्ये क्लिनिकल फार्माकोलॉजी आणि ग्लोबल हेल्थच्या प्राध्यापक आहेत. त्या युगांडा येथील कंपाला स्थित मकेरेरे युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ हेल्थ मध्ये संशोधक अभ्यासक म्हणून देखील कार्यरत आहेत. त्याचबरोबर, अॅलिस्टर सुटक्लिफ हे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन मध्ये बालरोग विभागाचे प्राध्यापक आहेत.
- स्तनपान करताना स्तनाग्रांना जखम होणं, त्याला सूज येणं सामान्य आहे का? प्राध्यापक कॅट्रिओना वाएट सांगतात की, या प्रश्नाचं उत्तर देणं तसं कठीण आहे. कारण स्तनपानाच्या सुरुवातीला थोडाफार त्रास होतो आणि हे सामान्य आहे. आणि सुरुवातीच्या काळात स्तनाग्रांना सूज देखील येऊ शकते. पण बाळाला दूध पाजल्यानंतर आईला स्तनांमध्ये जास्त वेदना किंवा सूज जाणवायला नको. जर असं झालं तर स्तनाग्रांना संसर्ग झाला आहे. किंवा मग दूध पाजताना त्या बाळाला नीट पकडत नसाव्यात.
- एखादी गोष्ट जी आईला तिच्या मुलाला स्तनपान करण्यास प्रोत्साहित करेल ती गोष्ट आरोग्यासाठी चांगली असते. मानवी वर्तनावर कोणत्याही प्रकारचं बंधन लादणं किंवा वेळेची कोणतीही कठोर अट ठेवणं हे विज्ञानाला धरून नाही. पण बाळाच्या जन्मानंतर लगेचच त्याला स्तनपान केल्यास अनेक फायदे मिळतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे बाळाला त्वरित पोषण मिळते. दुसरं म्हणजे, यामुळे गर्भाशयाची आकुंचनाची प्रक्रिया देखील सुरू होते. बाळंतपणानंतर गर्भाशयातून जो रक्ताचा प्रवाह सुरू असतो तो थांबण्यास मदत होते. याव्यतिरिक्त बाळाच्या जन्माच्या काही दिवस आधी आईच्या शरीरात कोलोस्ट्रम नावाचा विशेष प्रथिनयुक्त पदार्थ तयार झालेला असतो. यामुळे आईला दूध येण्यास मदत होते.
- जगभरातील प्रत्येक आईचा एकच प्रश्न असतो की, मी घेतलेलं एखादं औषध माझ्या बाळासाठी सुरक्षित असेल ना? वस्तुस्थिती अशी आहे की आई जर एखादं औषध घेत असेल तर त्यातील काही औषधंच अशी आहेत जी अगदी थोड्या प्रमाणात आईच्या दुधावाटे बाळापर्यंत पोहोचतात. जर डॉक्टरांनी एखादं औषध घ्यायला सांगितलं असेल तर तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारू शकता. परंतु, साधारणपणे अशी औषधं मुलांसाठी हानिकारक नसतात. बाळाची सर्वात मोठी गरज असते ती म्हणजे एक निरोगी आई. संसर्ग, नैराश्य किंवा वेदनांसाठी असलेली बहुतेक औषधं मुलांसाठी सुरक्षित असतात.
- स्तनपान करण्यापूर्वी साधं अन्न खावं, मसालेदार अन्न टाळावं. तुमच्या बाळाला दूध पाजण्यापूर्वी तुम्ही अमुक तमुक खाऊ नये असं काही नसतं. मात्र, तुम्ही जे खात आहात त्याचा तुमच्या दुधावरही परिणाम होतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये आईचा एक पॅटर्न पाहायला मिळाला आहे. माझ्या एका मुलाला स्तनपान करताना माझ्या लक्षात आलं की जेव्हा मी संत्र्यासारखा आंबट रस प्यायचे तेव्हा तो खूप चिडचिड करायचा. विशिष्ट प्रकारचं अन्न खाल्ल्यानंतर तुमचं बाळ वेगळ्या पद्धतीने वागतं हे तुम्हाला जाणवेल. कदाचित ते तुमच्या खाण्यापिण्याशी संबंधित असेल. पण असं कोणतंही अन्न नाही जे तुम्ही स्तनपानादरम्यान खाऊ शकत नाही. नाहीतर ते तुमच्या मुलासाठी हानिकारक ठरू शकतं.
- जर तुम्ही स्तनपान करत असाल तर बाळाला वरचं दूध पाजता येत नाही. हा कोणता सिद्धांत नाहीये की जो तुम्ही पाळलाच पाहिजे. आईच्या स्तनातील दूध हे मागणी आणि पुरवठ्यावर तयार होत असतं. कोणत्याही स्त्रीच्या शरीरात खूप विलक्षण गुण असतात, ज्यामुळे तिच्याकडे तिच्या मुलाच्या गरजेसाठी पुरेसं दूध असतं. जेव्हा बाळ स्तनाग्र चोखतं तेव्हा आईच्या शरीरातून काही हार्मोन्स बाहेर पडतात, जे बाळाला आवश्यक असलेलं दूध तयार करतात. म्हणूनच जरी तुम्ही अगदी लहान बाळाला स्तनपान करत असाल किंवा मोठ्या बाळाला स्तनपान करत असाल किंवा जुळ्या मुलांना स्तनपान करत असाल तरी आईच्या शरीरात पुरेसं दूध तयार होत असतं. जर तुम्ही बाळाला वरचं दूध पाजायला सुरुवात केली तर तुमच्या शरीराला हार्मोन्सचे संकेत मिळणार नाहीत. तुमच्या बाळाला दुधाची जास्त गरज आहे हे तुमच्या शरीराला कळणार नाही. तुम्हाला पुरेसं दूध येत नसेल आणि तुम्ही बाळाला वरचं म्हणजे फॉर्म्युला दूध पाजण्यास सुरुवात केलीत, तर तुम्हाला त्याक्षणी बरं वाटेल, पण नंतर यामुळे समस्या उद्भवू शकतात.दुसरीकडे जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल, तुम्ही थकलेले असाल किंवा आजारी असाल तर तुम्ही तुमच्या बाळाला वरचं दूध पाजू शकता. पण याचा अर्थ असा नाही की त्यानंतर तुम्ही बाळाला तुमचं दूध पाजूच शकत नाही.
- जर तुम्ही आजारी असाल तर तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान करू नये प्राध्यापक अॅलिस्टर सुटक्लिफ सांगतात, हा एक गैरसमज आहे. एकच परिस्थिती असते ज्यामध्ये आई आपल्या मुलाला दूध पाजू शकत नाही आणि ती म्हणजे जेव्हा तिला एचआयव्ही किंवा हिपॅटायटीसची लागण झालेली असते. हे विषाणू दुधातून बाळाच्या शरीरात जातात. बहुतेक आजारांदरम्यान मुलांना आईचं दूध पाजण्यात कोणतीही अडचण येत नाही. कारण आजारपणात आईच्या शरीरातून अँटीबॉडीज बाहेर पडत असतात, ज्यामुळे तिच्या नवजात बाळाचंही संरक्षण होतं. असं क्वचितच घडतं की आईचा आजार बाळालाही होतो.
- जर तुम्ही एका वर्षापेक्षा जास्त वेळ स्तनपान करत असाल तर तुमच्या बाळाची ही सवय सोडवणं कठीण होतं प्राध्यापक कॅट्रिओना वाएट सांगतात की, जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलीय त्याप्रमाणे बाळाला जन्मानंतर सहा महिने स्तनपान करावं. यानंतर त्याला इतर पोषक तत्वं द्यायला सुरुवात करावी. पण, या काळात आईने आपल्या मुलाला हवं तेवढं स्तनपान करायला हरकत नाही. स्तनपान नेमकं केव्हा थांबवावं याबद्दल तज्ञ कोणताही सल्ला देत नाही. ब्रिटन सारख्या उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये एक ते दोन वर्षातच मुलांचं दूध सोडवलं जातं. तर युगांडासारख्या कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये माता आपल्या मुलांना तीन तीन वर्ष दूध पाजतात. पण जागतिक अडचण सांगायची तर डब्ल्यूएचओने शिफारस करून देखील अनेक देश स्तनदा मातांना पुरेशी प्रसूती रजा देत नाहीत.
(सदर लेख प्रसिद्ध करण्यामागे उद्देश जनजागृती व्हावी हा आहे. तरी हा लेख माहिती म्हणून विचारात घ्यावा.)