मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन उपक्रमाअंतर्गत आज वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) दुसरा सार्वजनिक वाहतूक दिन पाळला जात आहे. मात्र या उपक्रमाला बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका बसला आहे. वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्थानकांवरून बीकेसीमध्ये पोहोचण्यासाठी दररोज हजारो प्रवासी बेस्ट बससेवेवर अवलंबून असतात. परंतु संपामुळे आज बीकेसी मार्गावर अत्यंत कमी बस धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. परिणामी अनेकांना रिक्षा आणि टॅक्सीचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. बीकेसी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करणे, प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे या उद्देशाने दर शुक्रवारी सार्वजनिक वाहतूक दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील शुक्रवारी या उपक्रमाचा पहिला दिवस पार पडला होता. मात्र सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याच्या आवाहनाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी सक्षम नसल्याची तक्रार करत अनेक नागरिकांनी या उपक्रमाकडे पाठ फिरवली होती.
दुसऱ्या सार्वजनिक वाहतूक दिनालाही प्रतिसादाबाबत प्रश्नचिन्ह असतानाच बेस्टच्या १२ कामगार संघटनांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईतील बससेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. दररोज मुंबईत बेस्टच्या सुमारे २,७६६ बस रस्त्यावर धावतात. मात्र आज केवळ ३८ बस सेवेत दाखल झाल्या असून त्यापैकी ६ बस परतल्याने सध्या अवघ्या ३२ बस कार्यरत आहेत. वांद्रे पूर्व आणि कुर्ला रेल्वे स्थानकांहून बीकेसीकडे जाणाऱ्या बससेवाही अत्यंत मर्यादित प्रमाणात सुरू असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे बीकेसीत येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांना रिक्षा व टॅक्सीवरच अवलंबून राहावे लागत आहे. दरम्यान, बीकेसी मार्गावर नेमक्या किती बस धावत आहेत याबाबतची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नसली, तरी सार्वजनिक वाहतूक दिनाच्या पार्श्वभूमीवर शक्य तितक्या बस सेवा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

