मुंबई : उद्धव ठाकरें विरोधात भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन खोटी आणि दिशाभूल करणारी विधानं केल्याचं तक्रारीत म्हटल आहे. त्याचबरोबर सत्ताधारी भाजपवर चुकीचे आरोप केले आणि निवडणूक आयोगावरही आरोप केलेत…हे आचारसंहिता उल्लंघन असून यावर कारवाई करण्याची मागणी आशिष शेलार यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली. मुंबईत मतदानात सुरू असलेल्या दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे संतापले. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी सेना भवनमध्ये संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन केला.. तसंच कितीही उशीर झाला तरी हटू नका मतदान करा, असं आवाहनही त्यांनी मतदारांना केले होते.
विशेष म्हणजे पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे स्वतः माहिम कोळीवाडा या ठिकाणी गेले. तिथे त्यांनी शिवसेना पदाधिका-यांशी चर्चा केली. तसंच त्यानंतर त्यांनी धारावीत जाऊनही आढावा घेतला. तर वडाळा आणि परळलाही त्यांनी भेट दिली. भांडुपमध्ये पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं मोठा राडा झाला. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचा डेमो ठेवल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे आमदार सुनील राऊतांनी संताप व्यक्त केला. त्यांनी पोलिसांना तंबी दिली. तर पराभवाच्या भीतीने रडीचा डाव सुरू असून, कायदा हातात घेणा-यांवर कारवाई केली जाईल असा इशारा शिंदेंनी दिला. महाराष्ट्रातील १३ जागांसाठी मतदानाचा पाचवा आणि अखेरचा टप्पा पार पडला. निवडणूक आयोगानं दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात रात्री ७ वाजेपर्यंत सरासरी ५२.५४% मतदानाची नोंद झालीय… दिंडोरीत सर्वाधिक ६१.९६% तर सर्वात कमी मतदान कल्याणमध्ये ४५.६७% इतकं झालंय… अनेक ठिकाणी संध्याकाळी ६ नंतर देखील मतदार रांगेत उभे होते. त्यामुळं मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, डॉ. भारती पवार यांच्यासह अरविंद सावंत, वर्षा गायकवाड, डॉ. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, उज्ज्वल निकम, हेमंत गोडसे, राजन विचारे अशा दिग्गजांचं भवितव्य ईव्हीएममध्ये सीलबंद झाले.