मुंबई : ऑक्टोबर महिना आता संपण्यास आला असून, नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशीच बँक खात्यासंदर्भात एका नियमात बदल होणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. नव्या बदलानुसार, आता खातेधारकांना आपल्या बँक खात्यासोबत एकाच वेळी चार जणांना नॉमिनी म्हणून ठेवता येणार आहे. बँकिंग क्षेत्रात क्लेम सेटलमेंटमध्ये पारदर्शकता आणि ही प्रक्रिया सहज बनवण्याच्या हेतूने हा बदल करत आहोत असं मंत्रालयाने सांगितलं आहे.
अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, नवीन तरतुदींनुसार बँक खातेधारकांना त्यांच्या खात्यासाठी चार नॉमिनी निवडण्याची परवानगी असेल. हे नॉमिनी एकाच वेळी किंवा अनुक्रमे निवडता येतील. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, खातेधारक सर्व नॉमिनी त्यांचा हिस्सा एकाच वेळी किंवा स्वतंत्रपणे मिळावा की नाही हे ठरवू शकतो. अनुक्रमे नामांकन पर्यायाचा अर्थ असा आहे की पहिल्या नॉमिनी व्यक्तीच्या मृत्यूनंतर, दुसरा नॉमिनी व्यक्ती, नंतर तिसरा आणि नंतर चौथा नॉमिनी वारसा हक्क सांगू शकेल. पीटीआयच्या माहितीनुसार, बँक खात्यांमध्ये नॉमिनी जोडण्याबाबतच्या नियमांमध्ये हा बदल बँकिंग कायदे (सुधारणा) कायदा, २०२५ अंतर्गत करण्यात आला आहे. तो १५ एप्रिल २०२५ रोजी अधिसूचित करण्यात आला. त्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कायदा, १९३४ आणि बँकिंग नियमन कायदा, १९४९ यासह प्रमुख आर्थिक कायद्यांमध्ये १९ सुधारणा समाविष्ट आहेत.

