नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (एनएमआयए) भव्य उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाल्यानंतर आता प्रवासी सुरक्षा आणि आरोग्य व्यवस्थेची तयारी वेगाने सुरू आहे. विमानतळावरील सुरक्षेसाठी ७ किलोमीटर अंतरावरील अग्निशमन यंत्रणेसोबत आपत्तीवेळी तातडीच्या मदतीसाठी एनएमआयएएलने केलेला करार आणि आता अपोलो रुग्णालयासोबत आरोग्यसेवेचा करार या दोन्ही उपक्रमांमुळे विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या जीवित सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
विमानतळाचे ऑपरेटर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. (एनएमआयएएल) आणि अपोलो रुग्णालय यांच्यात नुकताच सामंजस्य करार (एमओयू) झाला असून, त्याअंतर्गत विमानतळावर २४ तास कार्यरत राहणारे अत्याधुनिक वैद्यकीय केंद्र सुरू होणार आहे.विमानतळाच्या टर्मिनल १ येथे स्थापन होणारे हे वैद्यकीय केंद्र कामकाज सुरू होण्यापूर्वीच कार्यान्वित होईल. या केंद्रामध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवा, अपघात आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक सर्व सुविधा असतील. प्रवासी आणि कर्मचारी यांना तत्काळ आरोग्य सहाय्य मिळावे यासाठी येथे तीन डॉक्टर, आठ नर्सिंग स्टाफ आणि दोन ड्रायव्हर्स अशा प्रशिक्षित टीमची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व वैद्यकीय कर्मचारी अॅडव्हान्स्ड कार्डिओव्हस्क्युलर लाइफ सपोर्ट (ACLS) प्रमाणित असतील.प्रवाशांच्या आपत्कालीन उपचारांसाठी विमानतळावर दोन ऑन-साइट अतिदक्षता वैद्यकीय सेवेची उपकरणाने सज्ज असलेली रुग्णवाहिका उपलब्ध असेल. तसेच, ६५ ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर्स (AEDs) टर्मिनल परिसरात धोरणात्मक ठिकाणी बसविण्यात आले आहेत, जे हृदयविकाराच्या झटक्याच्या प्रसंगी त्वरित उपचारासाठी उपयुक्त ठरतील.

