कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरामध्ये बेकायदेशीररित्या पिस्तूल खिशात ठेवून फिरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. असाच प्रकार पुन्हा समोर आला असून डोंबिवलीत गावठी बनावटीच्या पिस्तूल व ६ काडतुसांसह एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डोंबिवली शहरांमध्ये एक इसम संशयितपणे फिरत असल्याची माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना मिळाली होती. त्यानंतर तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती घेऊन घटनास्थळ गाठले. तेथे गेल्यावर अधिकाऱ्यांचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्या इसमाला ताब्यात घेतले. या इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल, सहा काडतुस आणि दोन मोबाईल आढळून आले. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
अंकुश राजकुमार केशरवानी असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून एक लाख ३८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्यावर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भात त्याने हे पिस्तूल कोणत्या कारणाने आणलं होतं याचा तपास पोलीस करत आहेत.