कोल्हापूर : फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याचे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील पहिले आगमन झाले असून, त्यामुळे फळबाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री शाहू मार्केट यार्डातील गाळा क्रमांक १५ येथील दस्तगीर बागवान यांच्या प्रसिद्ध पेढीवर हापूस आंब्याच्या ४० पेट्यांची पहिली आवक नोंदविण्यात आली. ऐन दिवाळीच्या तोंडावर हापूस बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण असून, यंदा दिवाळीतच हापूसच्या आमरसाचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे ही आवक तामिळनाडूमधून झाली असली तरी या आंब्याची मूळ रोपे कोकणातील आहेत. कोकणातून नेण्यात आलेल्या अस्सल हापूसच्या रोपांची तामिळनाडूमध्ये लागवड करण्यात आली होती. तेथील अनुकूल हवामान आणि वातावरणाचा फायदा घेत शेतकऱ्यांनी दर्जेदार हापूसचे उत्पादन घेतले असून, त्यातील पहिली खेप आता कोल्हापूरच्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. कोकणातील उत्कृष्ट रोपे आणि तामिळनाडूतील पोषक हवामान यांच्या संगमातून तयार झालेल्या या हापूसला व्यापारी आणि ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हापूस आंब्याची बाजारपेठेतील मोठी मागणी लक्षात घेऊन कोल्हापूरातील फळविक्रेते प्रसाद नंदकुमार वळंजू यांनी या पहिल्या आवकीची खरेदी केली. दस्तगीर बागवान यांच्या पेढीवर आलेल्या १२ नगांच्या एका पेटीची खरेदी त्यांनी २ हजार ५०० रुपये दराने केली. हंगामाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या दरामुळे व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण असून, पुढील काही दिवसांत आवक वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिवाळीच्या काळात हापूस बाजारात दाखल झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांसह खवय्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे. हापूसचा गोडवा आणि सुगंध अनुभवण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर बाजाराकडे वळत असून, आगामी काळात आवक वाढल्यास दरातही काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पहिल्याच आवकीने कोल्हापूरच्या फळबाजारात चैतन्य निर्माण केले असून, यंदाचा हापूस हंगाम चांगला राहील, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
