मुंबई : मुंबईतील मानखुर्द परिसरात सोमवारी सकाळी बेस्टच्या बसचा भीषण अपघात झाल्याने एकाचा मृत्यू झाला असून चालक आणि वाहक जखमी झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बेस्ट बस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना घडलेल्या या अपघातामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या आणि रस्त्यावरील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा अपघात सायन–पनवेल महामार्गावरील विश्वकर्मा रुग्णालयासमोर घडला. ५०१ क्रमांकाची बेस्ट बस भरधाव वेगात असताना रस्त्यावरील दुभाजकाला जोरदार धडकली. सकाळी सुमारे ९.१४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुभाजकाजवळ उभे असलेले ६५ वर्षीय भास्कर रावसाहेब पांडे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या अपघातात बेस्टचे ४१ वर्षीय वाहक वैभव वाघमारे जखमी झाले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच ५१ वर्षीय बस चालक बनवारी श्रीराम प्रसाद शर्मा यांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळच्या गर्दीच्या वेळेत झालेल्या या अपघातामुळे सायन–पनवेल महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. अपघात नेमका कशामुळे झाला, बसवरील चालकाचे नियंत्रण कसे सुटले आणि इतर कोणते तांत्रिक कारण होते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा बेस्ट बसच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, अपघातांची मालिका रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

