नवी मुंबई : सहकार क्षेत्राच्या माध्यमातून प्रवासी आणि चालकांना पारदर्शक, सुरक्षित तसेच परवडणारी वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘भारत टॅक्सी’ सेवेचा अधिकृत शुभारंभ गुरुवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘भारत टॅक्सी’ ही केवळ वाहतूक सेवा नसून सहकार क्षेत्रातील नवी क्रांती असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेली ही संकल्पना प्रवाशांना रास्त दरात सुरक्षित प्रवास देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री (सहकार व नागरी विमान वाहतूक) मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, मंदाताई म्हात्रे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री आणि उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासगी ॲग्रीगेटर कंपन्यांनी वाहतूक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले असले तरी सण, उत्सव किंवा पावसाळ्यात होणारी डायनॅमिक प्राइसिंगमुळे वाढणारी भाडेवाढ आणि चालकांकडून आकारले जाणारे अवाजवी कमिशन यामुळे प्रवासी तसेच चालक दोघांनाही आर्थिक फटका बसत असल्याचे नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ‘भारत टॅक्सी’ ही सेवा सहकाराच्या बळावर उभारण्यात आली असून ती थेट चालक आणि प्रवाशांना जोडणारी व्यवस्था असेल. या सेवेअंतर्गत एकाच मोबाईल ॲपवरून कार, ऑटो-रिक्षा आणि बाईक टॅक्सी अशा तिन्ही प्रकारच्या सेवा उपलब्ध होतील. पहिल्या दीड किलोमीटरसाठी केवळ ३१ रुपये आणि त्यानंतर प्रति किलोमीटर २१ रुपये असा निश्चित दर ठेवण्यात आला असून, तो काळी-पिवळी टॅक्सीच्या धर्तीवर सर्वसामान्यांना परवडणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील स्थानिक रहिवासी आणि प्रकल्पबाधितांसाठी ही योजना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारने डिजिटल स्वाक्षरीसह ॲग्रीगेटर धोरणाची चौकट तयार केली असून, संपूर्ण आर्थिक व्यवहारांवर सहकार विभागाचे नियंत्रण राहणार आहे. पहिल्या टप्प्यात ६०० टॅक्सी सेवेत दाखल करण्यात आल्या असून, लवकरच हा आकडा १,००० पेक्षा अधिक करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. प्रारंभी मुंबई आणि पुणे येथे ही सेवा सुरू होणार असून, पुढील काळात महाराष्ट्रातील प्रत्येक शहर आणि जिल्ह्यात ‘भारत टॅक्सी’ सेवा विस्तारून प्रवाशांना अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा संकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

