डोंबिवली – डोंबिवलीतील शिळफाटा रस्त्यावरील गोळवली येथील रिजेन्सी इस्टेट गृहसंकुलामधील क्लब हाऊसला रात्री १२ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. बाहेर मुसळधार पाऊस सुरू असताना आग लागल्याने रहिवाशांची आग विझविण्यासाठी पळापळ झाली. जागरूक रहिवाशांनी क्लब हाऊसमधील अग्निरोधक यंत्रणेचा वापर करून आगीवर प्राथमिक स्तरावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. क्लब हाऊसमधील बहुतांशी काम फर्निचरचे असल्याने आगीने पेट घेतला. आजुबाजुच्या इमारतींमधील रहिवासी आग विझविण्यासाठी क्लब हाऊसच्या दिशेने धावून आले. अग्निशमन दलाला ही माहिती तात्काळ रहिवाशांनी दिली. रहिवासी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत असतानाच, अग्निशमन जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचे फवारे मारून आग बाहेर पसरणार नाही अशा पध्दतीने अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळविले. आगीमुळे क्लब हाऊसच्या आतील भागाचे नुकसान झाले. शाॅर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन जवानांनी वर्तविला आहे. या क्लबमध्ये रिजेन्सी इस्टेट मधील रहिवाशांचे विविध प्रकारचे सांस्कृतिक, मनोरंजन, घरगुती कार्यक्रम, विविध प्रकारच्या वस्तुंचे प्रदर्शनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.