नवी दिल्ली : फ्लाय दुबईच्या विमानात हवेतच झालेल्या जीवघेण्या चाकू हल्ल्यानंतर १७४ प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांना देशातील सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र प्रदान करण्याची मागणी जोर धरत आहे. सोशल मीडियावर हजारो नागरिकांनी भारत सरकारला कॅप्टन मच्छार यांच्या धाडसाचा सन्मान करण्याचे आवाहन केले आहे. संकटाच्या अत्यंत कठीण क्षणी त्यांनी दाखवलेले धैर्य, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे ते देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना कॅप्टन मच्छार यांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवले असल्याचे म्हटले आहे.
दुबईहून इस्त्राईलमधील तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या विमानात कॅप्टन स्मित मच्छार आणि सहवैमानिक कॉकपिटमध्ये असताना सहवैमानिकाने त्यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या झटापटीदरम्यान विमान सुमारे १४ हजार फूट खाली घसरल्याचे सांगितले जात आहे. गंभीर जखमी असूनही कॅप्टन मच्छार यांनी प्रसंगावधान राखत विमानावरील नियंत्रण मिळवले आणि ते सुरक्षितपणे सौदी अरेबियात उतरवले. त्यामुळे विमानातील सर्व १७४ प्रवाशांचे प्राण वाचले. सध्या त्यांच्यावर संयुक्त अरब अमिरातीमध्ये उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीसाठी भारतासह जगभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी व्हिडिओ कॉलद्वारे कॅप्टन स्मित मच्छार यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुंबईतील घाटकोपर येथे राहणारे कॅप्टन मच्छार यांच्या शौर्याबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये अभिमानाचे वातावरण असून घाटकोपर आणि टिळक नगर परिसरात त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी त्यांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. या घटनेची दखल इस्त्राईल सरकारनेही घेतली असून कॅप्टन स्मित मच्छार यांना विशेष सन्मान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच कॉकपिटमधील झटापटीदरम्यान हल्लेखोर सहवैमानिकाला रोखण्यात मदत करणाऱ्या चार इस्त्रायली प्रवाशांनाही ‘प्रेसिडेंट मेडल’ प्रदान करण्यात येणार आहे. कॅप्टन मच्छार आणि या चार प्रवाशांच्या धैर्याचा गौरव करण्यासाठी विशेष पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

