मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या पुढाकाराने यंदाही ‘मोदक महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमातून महिला बचत गटांनी तयार केलेले उकडीचे आणि तळलेले मोदक मुंबईकरांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. कामाच्या धावपळीत अनेकांना घरी मोदक तयार करणे शक्य होत नसल्याने नागरिकांना घरगुती चवीचे, दर्जेदार आणि सुरक्षित मोदक सहज मिळावेत, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. यासोबतच महिला बचत गटांना रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला आहे. महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल तुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, नागरिकांना https://shgeshop.com या संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी करून मोदक मागविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात पारंपरिक चवीचे मोदक घरपोच मिळण्यासोबतच महिला बचत गटांच्या उत्पन्नालाही मोठा आधार मिळणार आहे.
यंदाच्या मोदक महोत्सव २०२६ चे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे महिला बचत गटांना अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. महानगरपालिका आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मोदक तयार करताना स्वच्छता, अन्न हाताळणी, कच्च्या मालाची गुणवत्ता, सुरक्षित पॅकिंग तसेच अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणानंतर महिला बचत गटांनी सर्व नियमांचे पालन करून मोदक तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांना घरगुती चवीचे, स्वादिष्ट, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या निकषांची पूर्तता करणारे गुणवत्तापूर्ण मोदक उपलब्ध होत आहेत. या उपक्रमामुळे एकीकडे गणेशोत्सवाचा पारंपरिक गोडवा जपला जात असून, दुसरीकडे महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही मोठी चालना मिळत आहे.

