मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक दर्जेदार, पारदर्शक आणि रुग्णकेंद्रित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील शासकीय रुग्णालये तसेच बाह्यस्रोतांमार्फत (आऊटसोर्स) पुरविण्यात येणाऱ्या आरोग्यसेवांचे आता स्टार रेटिंग प्रणालीद्वारे मूल्यांकन केले जाणार आहे. सेवांमध्ये कोणताही गैरप्रकार, अनियमितता, निष्काळजीपणा किंवा गुणवत्तेचा अभाव आढळल्यास संबंधित संस्था व सेवा पुरवठादारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला. मुंबईतील आरोग्यसेवा आयुक्तालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी विविध आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत यांत्रिक धुलाई, प्रयोगशाळा (एचएलएल) सेवा, रक्त तपासणी, एक्स-रे, टेलिरॅडिओलॉजी, सीटी स्कॅन, एमआरआय, वैद्यकीय उपकरणांची देखभाल-दुरुस्ती, डायलिसिस, आहार पुरवठा, स्वच्छता आणि तांत्रिक सहाय्य अशा सेवांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक सेवांचे नियमित निरीक्षण करून सविस्तर गुणवत्ता अहवाल शासनाकडे सादर करावेत, असे निर्देशही देण्यात आले. नागरिकांना वेळेवर, सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे आबिटकर यांनी स्पष्ट केले.
राज्यातील सर्व सार्वजनिक आरोग्य संस्थांचे मूल्यांकन विशेष वैद्यकीय सेवांची उपलब्धता, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, औषधांचा पुरेसा साठा, प्रयोगशाळा सेवा, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा, प्रसूती व शस्त्रक्रियांची संख्या, स्वच्छता, उपलब्ध सुविधांचा वापर तसेच रुग्णांचे अभिप्राय या विविध निकषांच्या आधारे केले जाणार आहे. या माध्यमातून प्रत्येक रुग्णालयाच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होऊन सेवेच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा घडवून आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याशिवाय राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून सकस व पौष्टिक आहार पुरविण्याची योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक आमदारांच्या सहभागातून जनआरोग्य समित्यांच्या नियमित बैठका घेऊन त्यातील निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही भर देण्यात येणार आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय जनआरोग्य समितीच्या बैठकीपूर्वी सर्व जिल्ह्यांतील समित्या पूर्ण क्षमतेने कार्यरत असाव्यात, असेही स्पष्ट करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांची स्टार रेटिंग प्रणाली या तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला आहे. या माध्यमातून आरोग्यविषयक माहितीचा प्रभावी वापर करून नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

