ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मामणोली गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा २८ वर्षीय तरुणाशी होणारा बालविवाह प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून रोखला. चाईल्ड हेल्पलाईनच्या पुणे नियंत्रण कक्षाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर महिला व बाल विकास विभाग, पोलीस प्रशासन आणि चाईल्ड हेल्पलाईन यांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी मामणोली गावात अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याचे समोर आले. त्यानंतर चाईल्ड हेल्पलाईनच्या समन्वयक श्रद्धा नारकर यांनी माहिती देणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली. चौकशीत संबंधित मुलगी उल्हासनगर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नमिता शिंदे तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पथक उल्हासनगर येथे रवाना करण्यात आले. एकात्मिक बालविकास योजनेच्या सुपरवायझर सुषमा खरात, चाईल्ड हेल्पलाईनच्या सुपरवायझर स्वाती मोरे आणि केस वर्कर दीपाली कांबळे यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून संयुक्त कारवाई सुरू केली. संबंधित पत्त्यावर पोहोचल्यावर घराला कुलूप असल्याचे आढळले. त्यानंतर नातेवाईकांकडे चौकशी केली असता कुटुंबीय गावाला गेल्याची माहिती मिळाली. पुढे मुलीच्या आईशी दूरध्वनीवर संपर्क साधून तिला घटनास्थळी बोलावण्यात आले. मुलीच्या आधारकार्डासह जन्मतारखेची पडताळणी केली असता तिचे वय केवळ १६ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणानंतर प्रशासनाने तातडीने बालविवाह थांबवून पालकांना बालविवाहाचे कायदेशीर परिणाम आणि त्याचे गंभीर सामाजिक परिणाम समजावून सांगितले. तसेच भविष्यात बालविवाह होणार नाही, याबाबत पालकांकडून लेखी हमीपत्र घेण्यात आले. बालकल्याण समिती, ठाणे यांच्या आदेशानुसार मुलीला तिच्या पालकांच्या जबाबदारीवर सुपूर्द करण्यात आले. दरम्यान, ज्या २८ वर्षीय तरुणाशी विवाह ठरविण्यात आला होता, त्यालाही पालकांसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, ते उपस्थित न राहिल्याने संबंधित ग्राम बाल संरक्षण समितीला त्यांच्या घरी भेट देऊन पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, बालविवाहाची माहिती मिळाल्यास तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन १०९८, जिल्हा महिला व बाल विकास विभाग, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक किंवा संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा. बालविवाह ही कायद्याने प्रतिबंधित प्रथा असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी ग्राम बाल संरक्षण समिती, वॉर्ड बाल संरक्षण समिती आणि बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्रशासनाच्या तत्परतेमुळे एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य वेळीच सुरक्षित करण्यात यश आले असून, या कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

