ठाणे : ठाणे शहरातील प्रस्तावित रिंग मेट्रो प्रकल्पाविरोधात नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत असून, आता या प्रकल्पाच्या विरोधात रविवार, ३० ऑगस्ट रोजी नागरिक स्वाक्षरी मोहीम राबविणार आहेत. हा प्रकल्प शहरासाठी आवश्यक नसल्याचा दावा करत तो रद्द करण्यात यावा आणि त्याऐवजी शहराच्या मूलभूत गरजांवर भर देण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. विशेषतः पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी धरणांची उभारणी आणि सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी अधिक विद्युत बसगाड्या (ई-बस) उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मागण्यांकडे संबंधित प्राधिकरणांचे लक्ष वेधण्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. पोखरण रस्ता क्रमांक २ येथील आशर इन्फिनिटी, प्रशांत कॉर्नरजवळ रविवारी सकाळी १० वाजता ही मोहीम पार पडणार असून, या आंदोलनासाठी ॲड. राधिका राणे-शेडगे यांनी पुढाकार घेतला आहे. मोहिमेत सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी काळ्या रंगाचा ड्रेस कोड ठेवण्यात आला असून, रिंग मेट्रो प्रकल्पाविरोधात एकजूट दाखविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरम्यान, प्रशासनाच्या मते रिंग मेट्रो प्रकल्पामुळे ठाण्यातील अंतर्गत सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळणार असून नागरिकांना प्रवासासाठी आधुनिक पर्याय उपलब्ध होईल. या प्रकल्पाच्या कामालाही सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी मार्गरोधक उभारण्यात आले आहेत. मात्र, स्थानिक नागरिकांचा दावा आहे की, या प्रकल्पाचा प्रत्यक्ष फायदा मर्यादित राहणार असून उलट शहरातील वाहतूक कोंडी वाढली आहे. तसेच काही निवासी संकुलांच्या प्रवेशद्वारासमोरच मेट्रो स्थानके उभारली जाणार असल्याने स्थानिकांकडून त्याला तीव्र विरोध होत आहे. ॲड. राधिका राणे-शेडगे यांनी सांगितले की, ठाणेकरांना अंतर्गत मेट्रोपेक्षा खड्डेमुक्त रस्ते, पाण्यासाठी धरणे आणि अधिक ई-बस सेवा यांची गरज अधिक आहे. अंतर्गत मेट्रोमुळे नागरिकांना घरापासून कार्यालयापर्यंत थेट प्रवासाची सुविधा मिळणार नसल्याने हा प्रकल्प शहराच्या गरजांशी सुसंगत नसल्याचा त्यांचा दावा आहे. या आंदोलनाला कोणतेही राजकीय स्वरूप येऊ नये यासाठी सहभागी नागरिकांनी कोणतेही राजकीय बॅनर किंवा झेंडे आणू नयेत, असेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी नागरिकांनीच एकत्र येऊन आवाज उठवावा, हा संदेश या स्वाक्षरी मोहिमेतून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
