मुंबई : राज्यातील मतदारयादीच्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, या प्रक्रियेनंतर मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे प्रारूप मतदारयादीत समाविष्ट करण्यास अपात्र ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील एकूण ९.७८ कोटी नोंदणीकृत मतदारांपैकी तब्बल २ कोटी ७ लाख मतदारांचे गणना अर्ज संकलित होऊ शकले नाहीत. हे प्रमाण एकूण मतदारसंख्येच्या सुमारे २१.१५ टक्के इतके आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, या मतदारांपैकी ७५.५२ लाख मतदार पडताळणीदरम्यान अनुपस्थित आढळले किंवा त्यांचा शोध लागला नाही. तर ७६.८० लाख मतदार कायमस्वरूपी इतर ठिकाणी स्थलांतरित झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. याशिवाय ३४.८१ लाख मतदार मृत असल्याचे आढळून आले असून, १७.६३ लाख मतदारांची नावे अन्यत्र नोंदलेली किंवा दुबार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. तसेच सुमारे २.२३ लाख मतदार इतर विविध कारणांमुळे अपात्र ठरल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यभर ३० जून ते १७ ऑगस्ट या कालावधीत बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी घराघरात जाऊन गणना अर्ज संकलित केले. या मोहिमेनंतर ज्या मतदारांचे अर्ज मिळू शकले नाहीत, अशा मतदारांच्या तात्पुरत्या याद्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांच्या बूथस्तरीय प्रतिनिधींनाही या मतदारांची माहिती पडताळून आवश्यक तपशील प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतदारयादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने ही व्यापक पडताळणी मोहीम राबविण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
या प्रक्रियेनंतर आता पात्र मतदारांना आवश्यक दुरुस्त्या करण्याची आणि हरकती नोंदविण्याची संधी दिली जाणार आहे. मतदारांच्या तपशीलात बदल किंवा दुरुस्ती करण्यासाठी फॉर्म ८, तर एखाद्या मतदाराचे नाव वगळण्याबाबत हरकत नोंदविण्यासाठी फॉर्म ७ सादर करता येणार आहे. संबंधित बूथस्तरीय अधिकारी या अर्जांची पडताळणी करून अंतिम निर्णय घेतील. राज्याची प्रारूप मतदारयादी २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर नागरिकांना दावे आणि हरकती नोंदविण्यासाठी एक महिन्याची मुदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. या कालावधीत ज्यांचे नाव यादीत समाविष्ट झालेले नाही, अशा पात्र मतदारांना तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना फॉर्म ६ भरून मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. निवडणूक आयोगाने सर्व नागरिकांनी प्रारूप मतदारयादीत आपले नाव तपासावे आणि आवश्यक असल्यास वेळेत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन केले आहे. अंतिम मतदारयादी तयार करण्यापूर्वी प्राप्त होणारे सर्व दावे, हरकती आणि दुरुस्ती अर्ज नियमानुसार तपासले जाणार असून, त्यानंतरच अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे पात्र मतदारांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून आपले मतदानाचे हक्क अबाधित ठेवावेत, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

